HW News Marathi
महाराष्ट्र

“महिलांवरील अत्याचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित केल्यास मोठ्ठा बदल घडू शकेल” – अ‍ॅड रमा सरोदे

पुणे।मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.मात्र याच पार्श्वभूमीवर स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी काही संवेदनशील प्रक्रिया स्वीकारावी लागेल. तसेच अत्याचाराला बळी पडलेल्या आणि तशा घटनांचे साक्षीदार असलेल्या व्यक्तींना न्यायालयात केस उभी राहण्यापूर्वी प्रशिक्षण देण्याचा आधुनिक मार्ग वापरणे आवश्यक झाले आहे.वकील, पोलीस तसेच सरकारी वकील यांच्यासोबत प्रशिक्षण आयोजित करून महिलांवरील अत्याचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित केल्यास मोठ्ठा बदल घडू शकेल, असा विश्वास सहयोग ट्रस्ट च्या सचिव अ‍ॅड रमा सरोदे यांनी व्यक्त केला.

सरकारने पुढाकार घेणे जास्त परिणामकारक ठरेल

त्यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कळविले आहे. या पत्रावर अ‍ॅड. रमा सरोदे यांच्यासह नालंदा आचार्य, गौरांगी ताजणे तसेच रेश्मा गोखले यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे ऑगस्ट च्या ७ तारखेलाच असे सूचनापत्र सरकारमधील निर्णयक्षम लोकांना पाठविण्यात आले होते. प्रत्यक्ष बलात्काराची अमानुष घटना घडल्यानंतर, स्त्रियांवरील अत्याचाराबाबत चर्चा होताना दिसते, परंतु बलात्कारासारख्या घटना कमी करण्यासाठी सातत्याने व गंभीरपणे काम करण्यात सरकारने पुढाकार घेणे जास्त परिणामकारक ठरेल असे अ‍ॅड रमा सरोदे म्हणाल्या.

४७ बलात्काराच्या व खुनाच्या केसेस आहेत

पत्रात असाही उल्लेख करण्यात आला आहे की, NCRB च्या अहवालानुसार २०१९ या वर्षात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या २६९९ घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ४७ बलात्काराच्या व खुनाच्या केसेस आहेत आणि त्याचवेळी शिक्षा होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. मोफत कायदेविषयक सहाय्यता योजनांद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांना मदत करण्याच्या योजना असल्यातरी त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा स्त्रियांना आर्थिक मदत करणारी मनोधैर्य योजना पूर्णतः बंद झाली असल्याचे वास्तव दुःखद आहे. या पार्श्वभूमीवर, कोणालाही सहभागी करून न घेता बलात्कारग्रस्त स्त्रियांसाठी काम करण्याची पद्धत प्रभावहीन ठरते आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे.

कोणत्याच सरकारने योग्य प्रतिसाद दिलेला नाही

जे आहेत त्याच कायद्यांची अंमलबजावणी कायदेशीर काटेकोरपणे न करता अंमलबजावणीसाठी अशक्य स्वरूपाच्या कायद्यांची घोषणा करण्यात वेळ घालवणे अशक्तपणाचे लक्षण ठरेल. अनेक नवीन वकिलांना बलात्कारग्रस्त स्त्रिया, लैंगिक अत्याचाराशी सामना करणाऱ्या स्त्रिया यांना मदत करण्याची इच्छा आहे. नीट पूर्वनियोजन करून अनेक वकिलांचा पद्धतशीर सहभाग, हिंसेविरोधात काम करण्यासाठी व बलात्काराच्या खटल्यांमध्ये प्रत्यक्ष मदत करण्यासाठी घेतला जाऊ शकतो. मागील २५ वर्षांपासून विविध कायदेविषयक समस्यांवर काम करणाऱ्या सहयोग ट्रस्ट च्या “ह्युमन66 राईटस आणि लॉं डीफेन्डर्स” तर्फे सरकारला सोबत काम करण्याची तयारी असल्याचा प्रस्ताव अनेकदा देण्यात आला, परंतू २०१० पासून कोणत्याच सरकारने योग्य प्रतिसाद दिलेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा टोला

News Desk

“महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर”- शरद पवार

News Desk

मी कोणत्या भाजप नेत्यांशी चर्चा केली ते जाहीर कराच, जयंत पाटलांचे राणेंना आव्हान

News Desk