HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. ‘स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई’ तसेच ‘खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करुन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी (15 ऑक्टोबर) दिली.

 

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – २०२२ चे शनिवारी वरळी येथे आयोजन करण्यात आले होते,  मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या परिषदेस  खासदार राहुल शेवाळे आणि डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एमएमआरडीएचे आयुक्त  एस.व्ही.आर. श्रीनिवासन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, कन्स्ट्रक्शन टाईम्सचे राममूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या देशातील रस्ते चांगले असतील  त्या देशाची वेगळी ओळख निर्माण होते, तेथील विकासाची गती अधिक असते. यामुळे उद्योगधंद्यांना अधिक चालना मिळते. दळणवळण सुलभ झाले तरच सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, त्यासाठी मुंबई शहरातील ४५० कि.मी. रस्ते  सिमेंट काँक्रीट करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्याचे काम नामांकिंत कंपन्यांना देण्यात येणार असून कालमर्यादेपूर्वी आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना कामे दिली जातील. उर्वरित ४५० कि.मी.च्या कामांची निविदा येत्या मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. अशाप्रकारे मुंबईतील १०० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

आज आयोजित समिटमधून आलेल्या सूचनांचा शासन सकारात्मक विचार करुन या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येतील. असे सांगून  सध्या ३३७ कि.मी.मेट्रोचे कामे सुरु असून ही संपूर्ण कामे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे झाल्यानंतर १९ लाख प्रवासी मेट्रोमधून प्रवास करतील, यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक सुरळीत होऊन इंधनाच्या  बचती बरोबरच पर्यावरणात काही प्रमाणात सुधारणा होईल आणि प्रवासी  वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करू शकतील, असेही शिंदे म्हणाले.

 

मुंबई महानगरातील कोळी बांधवांसाठी पुनर्विकासाचे  कामे करत असताना मुंबईतील १४३ कोळीवाड्यातील नागरिकांच्या सल्ल्याने विकासाचे कामे करण्यात येणार आहेत. कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगारासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासात आलेल्या समस्या काही प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी साधारणत: 8 लाख नागरिक राहतात. विविध व्यवसाय करतात. त्यांचेही जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी विविध तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून विकास करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई- गोवा मार्गाची कामे सुरू आहेत, आता मुंबई -सिंधुदुर्ग रस्त्याचे कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून  एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने समन्वयाने विकासाचे कामे करण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच शहराच्या विकासात अनेक बांधकाम उद्योजकांचे मोठे योगदान आहे. या उद्योगांना विविध सवलती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरातील नागरिक स्थलांतर होऊ नये, यासाठी मुंबई शहरातच बांधकाम उद्योजकांनी नागरिकांना कमी किमतीत घरे देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूरमध्ये शेतक-यांचा संप सुरूच

News Desk

“…हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही,” उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Aprna

नांदेड महापालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल 

News Desk