HW News Marathi
महाराष्ट्र

“कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका”; फडणवीस भडकले

नाशिक | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले आहेत. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, प्रीतम मुंडे यांना केंद्रात जागा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यांना स्थान दिले नाही आहे.

देवेंद्र फडणवीस आज (८जुलै) नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले आहेत .

महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील चार लोकांना संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असं सांगतानाच नाशिक जिल्ह्याला 50 वर्षानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं, असं त्यांनी सांगितलं.

चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात

नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मी ईडीचा प्रवक्ता नाही

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे विन्डिक्टिव्ह काम करण्याची प्रथा नाही, असं त्यांनी सांगितलं.

प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याचं वृत्त चुकीचं

प्रीतम मुंडे यांचादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा बुधवारी सुरू होती. काही प्रसारमाध्यमांनी प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याचंही वृत्त दिलं होतं.  महाराष्ट्रातील इतर काही इच्छुक नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे देखील दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं होतं. “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत”, असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

मुंडे भगिनींना डावलल्याचा नाराजीचा सूर

बीड जिल्ह्यतील भाजपाचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि आठच दिवसात अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारस मुलगी पंकजा मुंडे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री तर दुसरी मुलगी डॉ. प्रीतम मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार केले. डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असा दावा समर्थकांकडून केला जात होता. मात्र पक्षाने वर्षभरापूर्वी राज्यसभेवर घेतलेल्या वंजारी समाजातील डॉ.भागवत कराड यांची वर्णी लावली. यामुळे पुन्हा एकदा पक्षाने मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समाज माध्यमातून समर्थकांनी लावला आहे. मात्र,पक्षाने केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही समाजातील इतरांनाही संधी दिली जाते हा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर मेळावा घेऊन प्रदेश नेतृत्वाविरुध्द अप्रत्यक्ष बंडच पुकारले होते. परिणामी विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न करुनही त्यांच्याऐवजी लातूरचे वंजारी समाजातील रमेश कराड यांना आमदार केले. तर भागवत कराड यांनाही पक्षाने थेट राज्यसभेवर घेऊन पक्षात मुंडे भगिनींच्या शिफारशीशिवायही निर्णय होऊ शकतात हा संदेश दिला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपबरोबर जोडलेला वंजारी व इतर ओबीसी समाज पक्षाबरोबर रहावा यासाठी भाजप नेतृत्वाने डॉ.कराड यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.कराड हे बीड जिल्ह्यच्या सरहद्दीवर असलेल्या चिखली या गावचे असून ते औरंगाबादला स्थायिक आहेत. दिवंगत मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांना काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गालाही बसला फटका…!

News Desk

पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष शिक्षा-विधेयक मंजूर

News Desk

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूसंख्येत होणारी वाढ चिंताजनक !

News Desk