बीड । कोव्हिड काळात बीड जिल्ह्यातील जेल प्रशासनाला कैद्यांना ठेवण्यासाठी ताब्यात देण्यात आलेले सामाजिक न्याय विभागाचे बीड शहरातील वसतिगृह धनंजय मुंडे यांच्या फोननंतर तातडीने जेल प्रशासनाकडून परत घेऊन सामाजिक न्याय विभागाला परत देण्यात आले आहे. यामुळे बीड शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक मुलींच्या वास्तव्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना फोनवरून याबाबत आदेश देऊन जेल प्रशासनास तातडीने हे वसतिगृह रिकामे करून देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतिगृह कोव्हिड काळात तात्पुरत्या स्वरूपात जेल प्रशासनास देण्यात आले होते. काही महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाचे वर्ग सुरू झाल्याने व जेल प्रशासनाने सदर वसतिगृह रिकामे करून न दिल्याने संबंधित मुलींची गैरसोय होत असल्याचे मुंडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सूत्रे हलवली आणि सदर वसतिगृह रिकामे करून सामाजिक न्याय विभागास तातडीने हस्तांतरित करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले.