HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता धवलसिंह मोहिते पाटील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

सोलापूर | सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (२८ जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील अखेर काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तास न्याय मिळाला नव्हता. यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते.

यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह याना गळाला लावलं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपासाठी ही जागा कशीतरी टोकावर निवडून आणता आली होती. मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना पक्षात दुर्लक्षित केल्याच लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोहिते पाटील पितापुत्र भाजपत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

धवलसिंह मोहितेंच्या उमेदवारीची चर्चा फोल

सध्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह आणि रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. काका आणि चुलत बंधू भाजपात गेल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत धवलसिंहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाल्याचं बोललं जातं. धवलसिंह यांचं नाव राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत निर्भया प्रकरणाची उजळणी!

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna

शिवसेनेच्या आमदारांची आज तातडीची बैठक

News Desk