HW News Marathi
महाराष्ट्र

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

पुणे | नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरिता येत्या काळात टप्प्याटप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत राज्यातील मनपा व राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मदत व पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. उपमुख्यमंत्री  पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निसर्गाचे ऋतूचक्र बदलले असून अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारख्या घटना घडत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, पशु-पक्षी, मालमत्तेला बसत आहे. अचानक येणाऱ्या आपत्तीमुळे जीवितहानी व मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येणाऱ्या आपत्तीची पूर्वसूचना मिळते.

आपत्तीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज आणि तत्पर असण्यासोबत कमीत कमी वेळेत ठिकाणी पोहोचली पाहिजे. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पुनवर्सन करण्यासाठी ११ हजार ७५० कोटी रुपये लागले आहेत. आपत्तीचा मुकाबला करण्याकरीता येत्या काळात टप्प्याटप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल. आर्यन पंम्पसारख्या नवीन उद्योगाच्या माध्यमातून यश मिळवून मराठी माणूस राज्याचे नाव जागतिक पातळीवर कोरण्याचे काम करीत आहे, याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

आपत्तीत नागरिकांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य-विजय वडेट्टीवार

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागात शीघ्र प्रतिसाद अग्निशमन वाहन उपलब्ध होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कोरोनासारख्या महामारीशी मुकाबला करत राज्य शासनाचे दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम विभागाच्यावतीने करण्यात येते. देशात महाराष्ट्र कोणत्याही संकटास तोंड देण्यासाठी समर्थ आहे. जागतिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन मराठी उद्योजक काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. पूरपरिस्थितीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने वाहनाची निर्मिती करावी, असे आवाहन मदत व पुनवर्सनमंत्री  वडेट्टीवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यात चांगली निर्मिती होत असल्याचा अभिमान-दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री भरणे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचा घटक म्हणून याप्रकारच्या वाहनांचे इंदापूर तालुक्यात उत्पादन होत आहे, अभिमानाची बाब आहे. येत्या काळात अशा उद्योगासाठी सहकार्य करण्यात येईल. यावेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पुणे मनपाचे सुनील शंकर, ठाणे मनपाचे संतोष कऱ्हाळे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अरविंद सावंत यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

आर्यन पंम्पस् चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी सॅनिटेशन, अत्याधुनिक अग्निशमन, शीघ्र प्रतिसाद वाहनाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. बालेवाडी येथे होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ या टेनिस स्पर्धेच्या चषकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता शांत आणि समाधानी वाटत आहे, माझे लोक घरी जातील “

News Desk

“मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी”, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

यशवंत जाधवांच्या डायरीतल्या ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

News Desk