HW News Marathi
Covid-19

अखेर खडसेंच्या पाठपुराव्यानेच जळगावला मिळणार रेमडेसिव्हिरचे ३००० डोस

जळगाव | जळगावात रेमेडेसिव्हिरचा तुटवडा झाल्याची तक्रार भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली होती. याची दखल घेण्यात आली असून जळगावला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हिरचे ३००० डोस मिळणार आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. असे असले तरी जळगाव जिल्ह्यात आज (७ एप्रिल) ३००० इंजेक्शनचे डोस प्राप्त होतील, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती दहा हजारांवर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासत असून, त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही वाढला आहे.

खडसेंचा पाठपुरावा

या स्थितीत इंजेक्शनअभावी अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असून, जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याने माजी मंत्री खडसे यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त अनिल माणिकराव यांच्याशी चर्चा केली. या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात होतो, त्यात अडचणी आल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री शिंगणेंशी चर्चा

या संदर्भात खडसे व डॉ. जगवानी यांनी राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. उत्पादन व पुरवठा होत नाही, तोवर जिल्ह्यातील नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय, असा प्रश्‍न करत खडसे यांनी मंत्र्यांना रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्याबाबत विनंती केली. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यात रेमडेसिव्हिरच्या किमान तीन हजार व्हायल्स पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच १२ एप्रिलनंतर रुग्णांसाठी आवश्‍यक साठा उपलब्ध होऊन डोसेजचा पुरवठा सुरळीत होईल, असेही सांगण्यात आले.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आज अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनसाठी जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध होत नाही.”“त्यामुळे जिल्ह्यातील पाचोरा, चोपडासह इतर ठिकाणची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या इंजेक्शन अभावी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही शासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे दिसत नाही,” असेही गिरीश महाजन म्हणाले होते.

इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे सांगितले आहे. मग ते रुग्णांना का मिळत नाही. त्याचा काळाबाजार होत आहे का? याचा तपास शासनाने करावा. तसेच झोपेतून जागे होऊन इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करुन त्यांचे जीव वाचवावे,अशी मागणीही त्यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

News Desk

शरद पवार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इराणमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी सुखरूप परतले..

Arati More

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

News Desk