HW News Marathi
देश / विदेश

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला विरोधी पक्षाचा पाठींबा

नवी दिल्ली | नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदवेळी दुपारी ३ वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 8 तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा उद्या (८ डिसेंबर) संप करण्याचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेता नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ ११ विरोधी पक्षांनी एक निवेदन जारी केलं आहे. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, पीएजीडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), आरएसपी, आरजेडी, द्रमुक आणि एआयएफबी यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कृषी कायदा २०२० मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला आणि त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आमचा पाठिंबा आहे, असं विरोधी पक्षांनी या निवेदनात म्हटलं आहे.

समाजवादी पार्टी यात्रा काढेल

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे उद्यापासून किसान यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात सपा किसान यात्रा काढली जाईल अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.

आम आदमी पक्षाचा पाठिंबा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील जनतेने शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरातील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शांततेत बंदला पाठिंबा देतील. सर्व देशवासियांना शेतकर्‍यांना साथ द्यावी आणि त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय.

कॉंग्रेसचाही पाठिंबा देईल

८ डिसेंबरच्या भारत बंदला कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. याआधीही कॉंग्रेस पक्षाने संसदेपासून ते रस्त्यापर्यंत शेतकरीविरोधी तिन्ही काळ्या कायद्यांविरोधात जोरदार लढा दिला आहे, असं कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले.

टीआरएसचाही पाठिंबा

तेलंगणातही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्याची तयारी सुरू आहे. आम्ही संसदेत कृषी विधेयकालाही विरोध केला होता आणि आम्ही आपला विरोध सुरूच ठेवू. कोणत्याही कायद्यात किमान आधारभूत किंमतीच्या तरतूद केल्याचा उल्लेख नाही आणि त्याच वेळी, जर देशात बाजार समिती यंत्रणा संपली तर शेतकर्‍यांना पर्याय राहणार नाही. यामुळे आमचा शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा आहे, असं टीआरएस नेत्या कविता म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवउद्योजकांच्या निर्मितीवरच त्यामुळे ‘घाव’ बसेल असे होऊ नये !

News Desk

उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे म्हणतात, “परमेश्वरालाच ठाऊक”

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२४, मुंबई-ठाण्यात प्रत्येकी १ नवा रुग्ण

News Desk