HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत, पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर कायमच ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करत असतात. आता तर थेट पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल सुरू केली असेही त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. मात्र, राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली, या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन! खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केंव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आपण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

आपले सर्वेसर्वा मार्गदर्शक अर्थातच शरद पवार आहेत. ज्यांची खिल्ली बाळासाहेबांनी पाकधार्जिणा म्हणून अनेकदा उडविली ते फारुख अब्दुल्लादेखील आहेत. असो, अशी नोंद इतिहासानं तुमच्याबद्दल घेऊ नये म्हणून मी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून तुमच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला करवून देत आहे.

1) दिल्लीत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह जो सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे,त्याचे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे आणि त्याचा पैसा ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी व्हावा, अशी मागणी या पत्रात आपण केलेली आहे. उद्धवजी! मग मंत्रालयासमोर 900 रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला मनोरा आमदार निवास प्रकल्प थांबवून आपण तो निधी ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदीसाठी करणार आहात का?

तसे केल्यास महाराष्ट्र आपले कौतुकच करेल. आधी हा प्रकल्प 600 रुपयांचा होता नंतर त्यात 100+100अशी 300 वाढ करण्यात आली, ती कशासाठी आणि कोणासाठी ? फडणवीस सरकारच्या काळात हे कंत्राट केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीला देण्यात आले होते. आपल्या कार्यकाळात ते काढून घेण्यात आले आणि खासगी कंपनीला दिले जात आहे, हे कशासाठी आणि कोणासाठी ??

2) मोफत कोरोना लसीकरण सर्व वयोगटांसाठी देशभरात तत्काळ सुरू करा,अशी मागणी आपण या पत्रात केली आहे. उद्धवजी! आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. मुंबईसाठी 50लाख लशींची खरेदी करण्यासाठीची निविदा शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने काढली आहे. मुंबई मनपाकडे असलेल्या 79 जार कोटींच्या बचत ठेवी वेळीच (टक्केवारी कापून ) रयतेसाठी वापरल्या असत्या तर संपूर्ण राज्याचे लसीकरण झाले नसते का?

मुंबईबरोबरच राज्यातील लहानमोठी शहरे आणि ग्रामीण भागातही लसींचा तात्काळ पुरवठा केला जाईल, असे आपण जाहीर का नाही करत? आपल्याला सामनाच्या अग्रलेखातून ‘कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ॲाक्सिजन कोण देणार?’असा सवाल उपस्थित करणायाची वेळच आली नसती. पण किमान आपल्या मुखपत्राने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीये हे मान्य केलंय, यासाठी हुजूऱांचं कौतुकच.

3) पीएम केअर फंड आणि इतर अनअकाऊन्टेड फंडात (म्हणजे काय हे कळले नाही) असलेला निधी व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी तत्काळ द्या, अशी मागणी आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. उद्धवजी! ही मागणी करत असतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत असलेली सर्व रक्कम ही कोरोना लढ्यासाठी देत असल्याचे आपण जाहीर केले तर आपल्या उक्ती व कृतीत कुठलीही तफावत नाही, याचे कौतुकच राज्यातील जनतेला वाटेल.

4) गरजूंना मोफत अन्नधान्य द्या आणि बेरोजगारांना सहा हजार रुपये महिना द्या, अशी मागणी आपण मोदीजींकडे रेटलेली आहे. त्या सोबतच आपण महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या साडेपाच हजार कोटी रुपयांपैकी किती रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात पडली याचा हिशेब व यादी देणार का? पुरवठादारांचं भलं करण्यासाठी आदिवासींना पैशांऐवजी खाद्यवस्तू पुरवण्याचे कंत्राट आपण रद्द करणार आहात का?

5) शेतकरी कायदे रद्द करा आणि तसे केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असे आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे?

‘उद्धवजी! आपल्यासह बारा नेत्यांनी मोदीजींना लिहिलेले पत्र वाचल्यानंतर महाराष्ट्रासंदर्भात मी हे सवाल केलेले आहेत. आपण उत्तर दिले तर ठीकच, समजा नाही दिले तरी जे समजायचे ते राज्यातील जनता समजूनच जाईल’, असे पडळकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खाऊ तिथे, आम्ही जाऊ’ ,सेनेत प्रवेश केलेल्या वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्यावर मनसेची टीका

News Desk

“…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

News Desk

“म्हणून पुढच्या वेळी..चड्डीत राहायचं !!”, नितेश राणेंचा शिवसैनिकांवर हल्ला

News Desk