HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे! – चंद्रकांत पाटील

पुणे। हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आतापासून पिण्याच्या पाण्याचे (Drinking Water) योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात जायका, २४ x ७ पाणी पुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रविंद्र बिनवडे, विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

मैलापाणी शुद्धीकरणासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासोबत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरचे पाणी औद्यागिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करावा.

समान पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटरमुळे निदर्शनास आलेली पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत. कमी पाणी मिळत असलेल्याची तक्रार असलेल्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी तेथील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी साठवण क्षमता २३ टक्क्यापासून ३३ टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २८७ द.ल.लिटर क्षमतेच्या ८२ नव्या टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी ४३ ची कामे पूर्ण झाली आहेत, तर १२ टाक्यांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. २१ टाक्यांची कामे सुरू आहेत. पाण्याचे ऑडीट करण्यासाठी २४६ पैकी २३५ इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटर बसविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जायका प्रकल्पांतर्गत नवे ११ शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे ३९६ द.ल.लिटर मैलापाणी शुद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ ठिकाणी ५५ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. अमृत योजनेतून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या

पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे  निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा, प्रस्तावित नवीन कामांचा, अपघातप्रवण ठिकाणी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत माहिती पालकमंत्री यांनी जाणून घेतली. जुना पुणे मुंबई रस्त्याचा विकास, प्रस्तावित कात्रज कोंढवा रस्ता, गंगाधाम चौक येथे उड्डाणपूल, खराडी मधील पूल व रस्ते विकास, बालभारती पौड फाटा प्रस्तावित रस्ता तसेच शिवणे खराडी रस्ता याबाबत माहिती घेऊन या प्रकल्पांमधील अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

शहरातील ६ पॅकेजेसमध्ये १०६ रस्ते दुरुस्तीची सुमारे ३३० कोटी रुपयांची कामे सुरू आहे. याव्यतिरिक्त पॅकेजेसमध्ये समाविष्ट नसलेल्या रस्त्यांवर विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत कालमर्यादा घालून त्यानुसार रस्ते दुरुस्तीचे नियोजन करावे. रस्त्यांच्या दुरुस्ती, खोदाईबाबत त्या भागातील नागरिकांना माहिती होण्यासाठी लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांची माहिती दिली, पुणे शहरात नव्याने समाविष्ट २३ गावातील २७३ कि.मी. रस्त्यांचा महानगरपालिका हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत ९४४ कि.मी. डांबरी, सिमेंटचे २१० कि.मी. तसेच अन्य रस्ते मिळून एकूण १ हजार ४०० कि.मी. चे रस्ते आहेत. त्यादृष्टीने शहरात रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्यात येत आहे. रस्त्यांचे अपूर्ण कामे पूर्ण करुन मिसींग लिंक जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अपघात प्रवण ठिकाणांची माहिती वाहतूक विभागाने दिली असून त्यानुसार मनपा आणि वाहतूक विभागाच्या समन्वयाने उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबिल ओढा आणि सिंहगड रोड वरील नाला कल्व्हर्टमुळे पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहतूक विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिले.

पुणे मेट्रोच्या प्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश

पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत असे निर्देश दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोद अग्रवाल, महामेट्रो कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे, प्रमोद आचार्य आदी उपस्थित होते.

यावेळी सद्यस्थितीत मेट्रो सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड मनपा स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ ते गरवारे स्थानकांदरम्यानच्या रोजच्या प्रवाशी वाहतुकीबाबत तसेच लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट, गरवारे कॉलेज ते सिव्हील कोर्ट आणि सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल क्लिनीक स्थानकांमुळे प्रवासी संख्येत वाढीचा अंदाज याबाबत पाटील यांनी माहिती जाणून घेतली. मेट्रोच्या या लवकरच सुरू होणाऱ्या सुमारे १२ कि.मी. च्या लांबीमुळे नागरिकांचा प्रवासाचा वाचणारा वेळ आणि खर्च आदी फायदे लोकांना पटवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रचार- प्रसिद्धी करावी, असे निर्देश त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविलेल्या पीसीएमसी ते निगडी या ४.४१ कि.मी.च्या आणि स्वारगेट ते कात्रज या ५.५ कि.मी.च्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक दीक्षित तसेच अन्य अधिकाऱ्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक  संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक  देवून गौरविण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त  रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर, पोलिस अधीक्षक पोलिस संशोधन केंद्र ज्योती क्षीरसागर  उपस्थित होते.

सन्मानचिन्ह पदक तसेच विशेष सेवा पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना  शुभेच्छा देवून संजय कुमार म्हणाले, पोलिसांनी   उत्कृष्ट कामगिरी केली असून  त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेबाबत शासनाने दखल घेऊन त्यांना गौरविले  आहे. त्यांनी यापुढेही अशीच चांगली सेवा बजावावी.

पोलीसांनी आनंदात आणि तणाव मुक्त राहून आपले कर्तव्य करणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने आपल्याला खूप काही दिले आहे. विभागासाठी काम करतांना आपण काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना चांगले कार्य करून आपल्या विभागाचे नाव नेहमीच उंचावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार आणि अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना  पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२०(पदक) आणि १५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ, ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

#CoronaVirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३६ वर

swarit

“आज जे काही आहे ते शरद पवारांमुळेच”, सुशीलकुमारांनी केले पवारांचे कौतुक

News Desk