पुणे | पुणे शहरातल्या आंबील ओढा येथील स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर देखील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. या घटनेवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेची चौकशी व्हावी. या घटनेवर पुणे महापौरांनी उत्तर द्यावं. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. शरद पवार साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र त्यांनी नवी नियमावली काढली आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंच्या टीकेवर महापौरांचे उत्तर
सुप्रिया सुळेंचं पुण्यात येणं कमी झालंय आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचं पुण्यात येणं कमी झालेलं आहे. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माहिती घेऊन बोललं तर बरं होईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं.
झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला महापौर मोहोळ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला झेपत नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं, असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.