पुणे। राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत ५ पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल, राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.
जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा
राज्यात तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.
स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा
ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्त्व देतो. १० हजारपेक्षा अधिक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर आपले खेळाडूदेखील गुणवंत आहेत. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली. राज्यातही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून शासनाने खेळाडूंना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. जीवनात खेळ महत्त्वाचा आहे, त्यापेक्षाही खिलाडूवृत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकण्याची जिद्द तयार होते. पराजयातून उभे राहून जिंकण्याची जिद्द मनामध्ये खेळाच्या माध्यमातून निर्माण होते.
राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. निरज चोप्रासारखा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक मिळवतो आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर राष्ट्रगीत वाजताना भारताचा तिरंगा वरवर जातो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा गौरव वाटतो, तोच देशाचा गौरव असतो. हेच खरे खेळाडूला मिळालेले पदक असते. सहभागी खेळाडू असे पदक देशाला मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेहनतीने खेळा, ताकदीने खेळा, पूर्ण जोर लावून खेळा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या खेळाडूंनी पदक मिळविण्याच्या जिद्दीने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यांना कोणी थांबवू शकणार नाही, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
‘बाज की असली उडान अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी नापी है मुठ्ठीभर जमीं हमने, अभी तो पुरा आसमान बाकी है,’ अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.