HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीच्या गुंड प्रवृत्तीला जशास तसे उत्तर देऊ, प्रविण दरेकरांचा इशारा

मुंबई | महाविकास आघाडीचा कारभार आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्यासाठी भाजपतर्फे पोलखोल अभियान रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. पण या अभियानाची आज (१९ एप्रिल) सुरुवात होण्याअगोदरच पोलखोल अभियान रथाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचे आढळून आले आहे. रथाच्या काचा फोडण्यात आल्या. भाजपनेही रथाची तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असावी असा संशय आहे. पण महाविकास आघाडीच्या गुंड प्रवृत्तीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.

भाजपच्या पोलखोल रथयात्रेची सुरुवात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते आज चेंबूर येथे झाली. पण अभियानाची सुरुवात होण्याअगोदरच पोलखोल अभियान रथाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर दिले जाईल. महाविकास आघाडी गुंड प्रवृत्तीला हाताशी धरून पोलखोल आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या प्रकरणात पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत चेंबूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन भाजपतर्फे सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत या तोडफोड प्रकरणात सामील असलेले कार्यकर्ते पोलिस पकडत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दरम्यान यातील चार जणांची ओळख पटली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या तोडफोडीत शिवसेनेचा हात आहे, असा स्पष्ट आरोप विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही लोकांसमोर महाविकास आघाडीचा घोटाळा मांडण्यासाठी हे आंदोलन छेडले आहे. तथापि महाविकास आघाडीने गुंड प्रवृत्तीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. या तोडफोडीत सामील असलेल्या आरोपींना पकडले नाही तर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.

पोलखोल आंदोलनाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असे दरेकर म्हणाले. दरेकर पुढे म्हणाले की, लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र उद्या वरून आदेश आल्यास सीसीटीव्ही खराब होते, असे कारण सांगण्यात येऊ शकते. असे झाल्यास पोलिस ठाण्यात पोलखोल सभा घेऊ, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

शिवसेनेला मुंबई महापालिकेतील त्यांचे घोटाळे बाहेर येतील, अशी भीती आहे, म्हणून ही पोलखोल यात्रा सफल होऊ नये, असा शिवसेनेचा डाव आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना इतकेच सांगणे आहे की, त्यांनी कायदा सुव्यवस्था राखावी. कारण सरकार राजकीय बैठका आणि इफ्तार पार्ट्यांमद्धे दंग आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. या पोलखोल अभियानप्रसंगी आमदार प्रसाद लाड, राजेश शिरवाडकर, निरज उभाळे, राहुल वाळंज, महादेव शिगवण, राजश्री पालंडे, अजीत सिंग आदी मान्यवर तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पोलखोल यात्रेचा समारोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सायन येथे होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंवर एनसीबी कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सत्कार

News Desk

भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही; आमदार साटम यांची बोचरी टीका

Aprna

“गतिमानपणे मुंबईचा कायापालट”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

Aprna