रत्नागिरी। भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असं सांगतानाच नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाच विनायक राऊत यांनी चढवला.
जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला
विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला. राज्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आता चार मंत्र्यांना घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
यात्रा निघाली नाही निघाली तरी महाविकास आघाडी सरकार कायम राहाणार
या यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारला टक्कर वगैरे काही मिळणार नाही. यात्रा निघाली नाही निघाली तरी महाविकास आघाडी सरकार कायम रहाणार आहे, असा दावा त्यांनी केला. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा होतोय. त्यावरून सुद्धा खासदार राऊत यांनी राणेंना लक्ष्य केलंय. नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वी वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातल्या सेनेची ताकद कमी होणार नाही, नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला. राणेंना शिवसेनेनेच दोन वेळा पराभव दाखवून दिलाय. राणे म्हणजे पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावंच. त्यामुळे भाजपचीच ताकदच कमी होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.
गडकरींबद्दल शिवसेनेला आदर आहे
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावरही भाष्य केलं. गडकरींबद्दल शिवसेनेला आदर आहे. गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबध आहेत. असं असताना गडकरी यांनी मग मीडियामध्ये हे पत्र का लिक केलं? असा सवाल राऊत यांनी केलाय. गडकरींनी एकाच बाजू सांगितली. मुंबई-गोवा महामार्ग भाजपच्या ठेकेदारांमुळे रखडला, रत्नागिरीत अशी दहा उदाहरणे आपण देवू शकतो, असे थेट आव्हान ही त्यांनी दिलं.
दरम्यान, निसर्ग, तोक्ते चक्रीवादळ व महापुरामुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी राज्यसरकारने भूमिगत विद्युत वाहिनीचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता 3500 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची सुरुवात सिंधुदुर्गमधून होणार असून दोन ते तीन वर्षात कोकण किनारपट्टीची गाव म्हणजे खाडी किनारपट्टी, समुद्र किनारपट्टी व नदी किनारपट्टीच्या गावात भूमीहीन विद्यूत वाहिनी टाकली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.