मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपचे मंत्री असते. ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते, असा दावा भाजपचे नेते नारायण राणे केली होता. जयंत पाटील यांनी राणेंचा हा दावा फेटाळून लावला असून भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली नसल्याचा खुलासा केला आहे.
“मी कोणत्या भाजप नेत्यांशी चर्चा केली ते जाहीर कराच, असं आव्हानही दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते, ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे”, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.
माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असं सांगतानाच नारायण राणे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असं आव्हानही त्यांनी राणेंना दिलं आहे.
राणे साहेबांची @BJP4Maharashtra च्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.@MeNarayanRane
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 30, 2020
काय म्हणाले होते नारायण राणे?
जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामापुरात जाऊन उत्तर देणार. पुढचे सरकार आमचेच येणार हे बोलण्याऐवजी जयंत पाटील पुढील सरकारमध्ये मीच मंत्री असेन असं बोलले असतील. आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे.