HW News Marathi
महाराष्ट्र

अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे – संजय राऊत


मुंबई। उत्तर प्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे.देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत

योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रिपुत्रास अटक केलीच नाही. प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा शेतकऱ्यांचे खून करणाऱ्या मंत्रिपुत्रास सन्मानाने बोलावून अटक केली. अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी. शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत. कृषिमंत्र्यांनी तरी तत्काळ लखीमपूर खेरीत पोहोचायला हवे होते. ते गेले नाहीच. उलट तेथे जाणाऱ्यांना रोखून ठेवले.लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजप खासदारांच्या दारात उभे राहिले. शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले. तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.

त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही

त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे.वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही.

शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला?

भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. तेव्हा वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली. लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे. तसे असेल तर ते गंभीर आहे. हिंदू आणि शीख एकच आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न देशाला आता परवडणारा नाही.

मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले. या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना. आजच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीरममध्ये लागलेल्या आगीत घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही – शरद पवार

News Desk

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

News Desk

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

News Desk