HW News Marathi
महाराष्ट्र

लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

“लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘आद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादिदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभुती दिली. लतादिदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली. 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादिदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादिदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वन सेवा उद्या ‘या’ वेळेत असणार बंद

Aprna

विकास कामांमध्ये राजकारण नको, अजित पवारांची मेट्रो कारशेडवर प्रतिक्रिया

News Desk

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच!

News Desk