HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाईअधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल! – प्रविण दरेकर

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. निकालानंतर दरेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले व महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त हे काही लोकांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध कट रचत होते. या सगळ्यांचे सीडीआर तपासले तर नेमके कसे कारस्थान रचले हे लक्षात येईल, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (१२ एप्रिल) केला.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, आज मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. कारवाई करून सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे जेवढा अन्याय करतील तेवढ्या जास्त ताकदीने मी या सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखालीच हे सर्व षड्यंत्र होते. आणि गुन्हा दाखल करून या सरकारचा अडकवण्याचा डाव होता. विरोधी पक्षनेता म्हणून या सरकारचे भ्रष्टाचार, घोटाळे, याचा पर्दाफाश करण्याचे काम मी करत होतो, त्याचा सूड उगवण्याचे काम अशा प्रकारच्या कारवाईतून सरकारला करायचे होते. सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत, मग भाजपचे जे नेते आरोप करतायत आपणही त्यांना उत्तर दिले पाहिजे, अशा प्रकारची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी ठरली. संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दबाव आणला आणि नाईलाजाने गृहमंत्री आणि गृहखाते कार्यान्वित झाले आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात व माझ्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आणि गुन्हे दाखल झाले आणि कारवाईचा ससेमीरा लावला. परंतु न्यायालयाने हे झिडकारून लावले आणि आम्हाला न्याय दिला, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

सोमय्या हे इतरांना पळविणारे नेते

किरीट सोमय्या हा पळणारा नेता नाही तर इतरांना पळवणारा नेता आहे. एक न्यायालयीन प्रक्रिया असते. सत्र न्यायालयात जामीन झाला नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागितला जातो. कायदेशीर कारवाया करण्यामध्ये ते व्यग्र असतील. त्यामुळे ते निश्चितच योग्य वेळी ते पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील. ते लपणार नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.

संजय राऊत यांचा अजेंडाच आहे की, भाजपचे नेते जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत त्यांना झोप लागणार नाही. त्यामुळे रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ भाजपच्या नेत्यांवर टीका करत, गुन्हे दाखल करत जेलमध्ये टाकणे हा राऊत साहेबांचा प्राधान्याचा विषय आहे. १०० टक्के सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील. परंतु माझा आक्षेप असा आहे की, किरीट सोमय्या काही आतंकवादी आहेत का? ते खासदार होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या घरी पोलिसांचा तांडाच्या तांडा घेऊन जाणार, कार्यालयात शोध घेणार, दबावतंत्र वापरणार, केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशातून सरकारने पोलिसांना अशा प्रकारचे टास्क दिले आहे. आणि मनात असो, नसो, पोलिसांना अशा अतिरेकी कारवाया कराव्या लागतात.

चित्रा वाघ या लढणाऱ्या नेत्या

चित्रा वाघ एक लढणाऱ्या नेत्या आहेत. आफ्टर थॉट ज्या स्टेटमेंट येतात त्या सरकार आपला प्रभाव वापरुन करायला लावत असल्याचे माझे स्पष्ट मत आहे, असे दरेकर यांनी सांगितले. पीडितेची उलट स्टेटमेंट आता आली असेल तर तो सरकारचा दबाव आहे. चित्रा वाघ या महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नेत्या आहेत. चित्रा वाघ पुराव्यानिशी बोलतात. महिलांच्या अत्याचाराविरोधात काम करतात. अशा लढणाऱ्या नेत्याविरोधात त्यांना अशा प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात प्लँन करून उभे करणे महिलांसाठी योग्य नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

Related posts

फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असं बोललोच नाही-रामदास कदम

News Desk

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये! – संजय राठोड

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना वाहिली श्रद्धांजली

News Desk