मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (३० मे) केली. मात्र, रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय आता मोठय़ा शहरांमध्ये महानगरपालिका आयुक्त वा जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकारी घेऊ शकतील. दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचे अधिकार सरकारने स्थानिक पातळीवर दिले आहेत.
रुग्णसंख्येनुसार दोन विभाग करण्यात आले आहेत. ‘अ’ श्रेणीत करोना चाचणीत १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्यांपेक्षा कमी भरलेल्या असल्यास निर्बंध शिथिल के ले जातील. अशी शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. अन्य दुकाने उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जाईल.
मात्र एकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. मॉल्स किंवा व्यापारी संकुले उघडण्यास परवानगी नसणार आहे. अत्यावश्यक सेवेप्रमाणेच अन्य दुकानेही दुपारी २ पर्यंतच उघडी ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील वगळता अन्य दुकाने शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बंद राहणार आहेत.
चाचणीत करोनाबाधितांचे प्रमाण २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये कडक निर्बंध लागू असणार आहे. अशा जिल्ह्य़ांच्या सीमा बंद केल्या जातील. जेणेकरून या जिल्ह्य़ातून लोक बाहेर जाणार नाहीत आणि अन्य जिल्ह्य़ातील नागरिका जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये येणार नाहीत. शेतीचा हंगाम असल्याने दुपारी २ पर्यंत खते, बि-बियाणे, अवजारे आदींची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला वेळेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आदींच्या पुरवठय़ासाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. दुकानांमध्ये कोणत्याही वेळी वस्तुंचा पुरवठा करू शकतात. फक्त मालाची साठवणूक करण्यासाठी दुपारी २ नंतर दुकाने उघडे ठेवू शकतील. पण त्या काळात ग्राहकांना विक्री करता येणार नाही. तसे आढळल्यास कडक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. हॉटेलांना आताप्रमाणेच घरपोच सेवेस परवानगी आहे. हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. हे नियम १५ जूनच्या सकाळी सातपर्यंत लागू राहतील.
कोणत्या दुकानांना परवानगी मिळणार?
केशकर्तनालये, संगणक, पावसाळी वस्तू , कपडे आदी दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का, याची नागरिकांना अधिक उत्सुकता आहे. कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरे किंवा जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते. कोणती आणि कशा पद्धतीने दुकाने उघडण्यास परावनगी द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.