HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तुफान पावसाशी राज्य सरकारचे दोन हात, मदतीसाठी तयार केला प्लॅन

मुंबई | राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांसोबतच कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसानं आपलं उग्र रूप दाखवलं आहे. रायगड, सातारा या ठिकाणी पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत ४० हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे नागरिक पावसाच्या आक्राळ-विक्राळ रुपाचा सामना करत असताना सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेमकी काय हालचाल सुरू आहे? यांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीपासून पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या आदेशांपर्यंत सर्व बाबींची त्यांनी माहिती दिली आहे.

नोडल अधिकाऱ्यांची केली नियुक्ती

राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं पूर स्थितीवर बारीक लक्ष

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोयनाच्या पाणीपातळीवर जयंत पाटील यांचं लक्ष

“कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत”, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

NDRF आणि सैन्यदलाचीही मदत

महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्र्यांना जिल्हा न सोडण्याच्या सूचना

दरम्यान, राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी परब थेट पवारांच्या भेटीला

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता तर तिला न्याय मिळाला असता

News Desk

मराठी भाषा भवन सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल! – सुभाष देसाई

Aprna