HW News Marathi
Covid-19

भाजपाची आजची काळी कृती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !

मुंबई | महाराष्ट्र भाजपचे आज (२२ मे) राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपने या आंदोलनाची हाक दिली मात्र राज्यभरातून या आंदोलनाला तितकासा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोनाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आता तरी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी”, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झालेत !

भाजपाच्या आजच्या आंदोलनाबाबत बोलताना थोरात म्हणाले की, “कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे.”

चंद्रकांत पाटील यांचे खरे आंगण कोणते?

“चंद्रकांत पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. ५ वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणा-या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून या मेरा आंगण मेरा रणांगण या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले”, असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा…!

“विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणा-या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररूपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम, विविध कल्याणकारी योजनांचा निधी व जीएसटी व्यतिरिक्त इतर करांच्या परताव्यापोटी रक्कम अद्याप दिली नाही. महाराष्ट्रातील ८.५० कोटी नागरिकांना रेशनद्वारे धान्य पुरवठा केला जात आहे यासाठी केंद्र सरकारकडे गहू पुरवठा करण्याची मागणी केली आहे पण केंद्र सरकारने अद्याप गहू दिला नाही. फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा पक्षातले आपण वजन खर्च करून महाराष्ट्राच्या हिश्श्याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असे म्हणत थोरात यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोजगार मिळवून देणाऱ्या या कंपनीतून ९६० कर्मचारी गमावणार आपलीच नोकरी

News Desk

राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ वर पोहोचला

News Desk

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला होणार सुरुवात

News Desk