अहमदनगर | अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता भाजपला तिसरा मोठा धक्का बसला आहे. कारण, अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे, सांगली आणि जळगावनंतर आता भाजपने नगरच्या निमित्ताने तिसरी महापालिका गमावली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नगरच्या निवडणुकीसाठी हा महाविकास आघाडीचा पॅटर्न निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची २२ जून रोजी अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. याच वेळी नगरच्या महापौर पदासाठी शिवसेनेचाच उमेदवार देण्यात येईल हे निश्चित झाले. तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असेही ठरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे, अहमदनगरच्या नवनिर्वाचित महापौर आहेत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे आणि उप महापौर आहेत राष्ट्रवादीचे गणेश भोसले. तर भाजपला मात्र, नगरमध्ये आता जोरदार धक्का बसला आहे.
खरंतर गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेवर राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. म्हणूनच काहीच दिवसांपूर्वी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानाची मोठी चर्चा रंगली होती. सुजय विखे पाटील काहीच दिवसांपूर्वी बोलताना असे म्हणाले होते कि, “पुन्हा योग जुळून आला, तर पुढील काळात एकत्र येऊ”. इतकेच नव्हे तर अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असेही सुजय विखे पाटील म्हणाले होते. त्यामुळे, यंदाही नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, तसे न होता यंदा नगरमध्ये महाविकासआघाडी पॅटर्नच पाहायला मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.