मुंबई | बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला देण्यात आली आहे. या जागेतील ‘मुंबई डबेवाला भवन’ चे उद्घाटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज (६ मार्च) झाले.
यावेळी उपमहापौर ॲड.सुहास वाडकर, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, “मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम ते अखंडपणे करीत असल्याने मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱ्या घटकांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे. कोविडच्या काळातही विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केल्याचे सांगून आज विविध ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या असतानाही डबेवाल्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते कुठेही मागे पडणार नाहीत, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. डबेवाल्यांसाठी भवन उभारण्याच्या दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचे डबेवाल्यांशी नाते जोडले गेले असल्याचे सांगितले. डबेवाल्यांसोबतच्या स्वतःच्या आठवणी सांगून डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन असावे, असा प्रस्ताव आल्यानंतर त्यास तातडीने मंजुरी दिल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविकादरम्यान सोपान मरे यांनी डबेवाला संघटनेची माहिती दिली. डबेवाल्यांची चौथी पिढी हे काम करीत असून सुमारे दीड लाख डबे पोहोचवण्याचे काम केले जाते. २००४ मध्ये इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईत आल्यानंतर डबेवाल्यांचे केलेले कौतुक आणि २००८ मध्ये इंग्लंडच्या शाही लग्न सोहळ्यास असलेली उपस्थिती याची आठवणही त्यांनी सांगितली.
यावेळी डबेवाल्यांच्या प्रतिकृतीचे शिल्पकार नीरज गुप्ता, लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य पुरवणाऱ्या युनायटेड वे चे उपाध्यक्ष अनिल परमार, मानधन न घेता सेवा देणारे डबेवाले संघटनेचे कायदेशीर सल्लागार रमेश मोरे, मार्गदर्शक सचिन शिवेकर यांचा ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.