HW News Marathi
Covid-19

“आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट करण्यात आले “, मोदींनी साधला डॉक्टरांशी संवाद 

नवी दिल्ली । राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस हा प्रख्यात डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आज १ जुलै, राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. गेलं दीड वर्ष देशभरातील डॉक्टर्स कोरोना महामारीला नष्ट करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या लाटेत कोरोना महामारीत तब्बल 730 डॉक्टरांचा बळी गेला आहे. आज (१ जूलै) एम्सने खास पद्धतीने वर्चुअल डॉक्टर्स डे साजरा केला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्या डॉक्टर्सशी संवाद साधला.

गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. डॉक्टरांनी देवदूत बनून आपले प्राण वाचवले आहेत. पीएम मोदी म्हणाले की कोरोना कालावधीत डॉक्टरांनी लाखो लोकांचे जीव वाचवले. डॉक्टर हे ईश्वराचा आणखी एक प्रकार आहे. तसेच, देशात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होत आहे, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.

देशात एम्सची संख्या वाढविली जात आहे

पंतप्रधान म्हणाले की, देशातील वैद्यकीय पायाभूत सुविधा सध्या उभ्या केल्या जात आहेत. कोरोना कालावधीत प्राण गमावलेल्या डॉक्टरांना सलाम. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशात एम्सची संख्या वाढविली जात आहे. त्यासोबत वैद्यकीय व्यवस्थाही सुधारली जात आहे. कोरोना संसर्गाविरोधातील लढ्यात डॉक्टरांच्या समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इतकेच नव्हेतर डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करण्यात गुंतले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर्सना लिहिले पत्र

मागील वर्ष दीड वर्षांपासून आपण सगळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत. आज काही प्रमाणात संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे, आणि पुढेदेखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने असा विश्वास मला आहे.

कोविडची महामारी ही रोज घडणारी गोष्ट नसते. अशा घटना, अशी महामारी कित्येक वर्षातून एकदा येते आणि तिच्याशी झुंजताना तुमचा माझा सगळ्यांचा कस लागतो. सीमेवरील युद्ध वेगळं असतं. तिथं शत्रू आपल्यासमोर असतो पण कोविडसारख्या रोगराईविरुध्दचे युद्ध ही वेगळी गोष्ट आहे. इथे शत्रू डोळ्यांनी दिसतदेखील नाही आणि तरीही लढाई सुरू आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळेतील चाचण्या रुग्णांवरील उपचार या साऱ्या बाबी जीवावर बाजी लावून आपण सारे करीत आहोत कारण हा अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही.

कोविडच्या या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टर म्हणून या कोविड विरोधी युद्धातील आघाडीचे योद्धे म्हणून आपण सर्वांनी जे मोलाचे योगदान दिले आहे, ते शब्दातीत आहे. मी मधल्या काळात आपणाशी वेगवेगळ्या निमित्ताने संवाद साधला आहे, आपल्या सूचनादेखील ऐकून घेतल्या आहेत. डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. महाराष्ट्र ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही.

कोविडविरुद्धचे हे युद्ध अजून संपलेले नाही, हे आपण जाणताच आणि म्हणून येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे. तुम्ही छोट्याशा खेडेगावात काम करत असा की मोठ्या सुसज्ज हॉस्पिटल मध्ये तुम्ही सगळेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुम्ही घरगुती विलगीकरणातील रुग्णाला सल्ला देत असाल की आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णाला वैद्यकीय कौशल्य पणाला लावून वाचवत असाल, तुमची प्रत्येक कृती या राज्याला आणि या राज्याच्या प्रत्येक नागरिकाला कोविडच्या विळख्यातून वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर घेतला चोरीचा आळ

News Desk

पुणे महानगरपालिकेचा ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम

News Desk

दिलासादायक ! राज्यात १०,२२१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk