कराड | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
सरकारमध्ये बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?
नरेंद्र पाटलांनी राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत
नरेंद्र पाटील यांच्या हातावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा टॅटू आहे. या टॅटूमुळे ते बरेच चर्चेत आहेत. “त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत” अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोण आहेत नरेंद्र पाटील?
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते आहेत. माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत. नरेंद्र पाटील विधिमंडळाचे माजी आमदार होते आणि नरेंद्र पाटलांनी शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सातारा मतदारसंघातून पराभवानंतर दीड वर्षांनी शिवसेनेला रामराम केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.