HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍या’ची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली. २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार असून या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १७ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच संवाद, समन्वय व पारदर्शकतेची भूमिका घेतली आहे. याआधीही पक्षाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ ही डिजिटल मोहीम हाती घेतली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सात लाख कार्यकर्त्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय या मोहिमेत नोंदवल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

सलग १७ दिवसांचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १४ जिल्ह्यांत जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत शिवाय पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही या दौऱ्यात बैठका घेतल्या जातील व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. येत्या काही दिवसातच नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Related posts

शिवसेनेच्या गैरहजेरीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झोपुच्या ‘आसरा अ‍ॅप‘चा शुभारंभ

Gauri Tilekar

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

News Desk