HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे !

मुंबई | देशातील कोरोना प्रादूर्भावाच्या वेगाने वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. कोरोना आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. “संपूर्ण विश्वात आज एकाच समस्येची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोनाचे संकट. कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे. भारतातही केंद्र सरकार व राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे सगळेजण कोरोनाला पराभूत करण्यासाठी धीराने उभे राहिले आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१४ एप्रिल) देशाला संबोधित करत पुढील दिवसांसाठी काही सूचना केल्या. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पूर्णपणे सहकार्य करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधून या संकटावर एकत्रितपणे मात कशी करता येईल याची चर्चा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही अशीच भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सतत सुसंवाद साधत आहेत. संवादाच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याची खबरदारी ते घेत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी ३ मे वाढवण्यात आला आहे, आपल्याला या काळात सरकारला पूर्णपणे सहकार्य करायचे आहे, असे पवार राज्यातील जनतेशी संवाद सांधताना म्हणाले. त्याचे कारण असे की पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्या इथली परिस्थिती वेगळी आहे. या आजाराची लागण झालेल्यांचा आकडा पाहिल्यास हे चिंताजनक चित्र आहे. कोरोनाचे १३०६ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३७७ रुग्ण दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. जे रुग्ण यात मृत्युमुखी पडले त्यात एका विशिष्ट वयाच्या वरील घटक जास्त आहेत. याचा नीट अभ्यास केला असता लक्षात येते की बळी पडणारे रुग्ण हे अन्य व्याधींनी ग्रासलेले होते. भारताचे वैशिष्ट्य असे की, शारीरिक दृष्ट्या एखाद्या आजाराला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे प्रतिकारशक्तीही जास्त आहे. त्यामुळे युरोप व अमेरिकेशी आपली तुलना शक्य होणार नाही. तसेच प्रशासनाकडून जी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व पावले टाकली गेली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात, अन्नधान्याच्या क्षेत्रात योग्य ती काळजी सरकारने घेतली आहे. कष्ट करणाऱ्या कामगार वर्गांचे काम दुर्दैवाने थांबलेय. पण त्यांना पुढेही सेवेमध्ये ठेवण्याची काळजी उद्योजकांनी घेतली पाहिजे.

परप्रांतीय कामगार हे आता आपल्या गावी जाण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतु राष्ट्र पातळीवर जे धोरण ठरले आहे. त्यानुसार त्यांना प्रवास करण्याची सुविधा आपण देऊ शकत नाही. मात्र, त्यांना अन्न व आरोग्य सुविधा देण्यासाठी आपले प्रशासन तसेच अन्य सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सरकारकडून या कामगारांना काही निधी देऊन, आधार देण्याची व्यवस्था होत आहे.

गरजूंच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटक पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षाचे घटकदेखील यात उतरले आहेत. यात कोणी राजकारण आणू नये. स्वतःची चिंता न करता समोरच्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतो आहे. अन्नधान्याच्या संबंधी जी काळजी घ्यायची ते संबंधित मंत्री छगन भुजबळ व त्यांचे सहकारी योग्यप्रकारे घेत आहेत. आज पर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाले आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही योग्य ती मदत केली जात आहे.

अर्थकारणावर या महामारीचा विपरीत परिणाम

अर्थकारणावर या महामारीचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजारपेठेला मर्यादा आल्या आहेत. शेतीवरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारात येण्यास संकटे येत आहेत. हातात आलेले पीक सोडून देण्याची भूमिका शेतकऱ्याला घ्यावी लागतेय. उद्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात बेकारी व बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी.

राज्यात मे महिन्यामध्ये साधारणतः पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घेऊन जिल्हा, तालुका पातळीवर योग्य ती काळजी व उपाययोजना आताच करायला हव्यात. पाणी संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी. कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांचे नसून आर्थिक क्षेत्रात यावर मात करण्यासाठी पुढील एक-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. यासाठी केंद्राने अजून खबरदारी घ्यायला हवी.

राजकारण करण्याची आताची स्थिती नाही

तसेच अन्न महामंडळ हे गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी याची खरेदी करतात त्याची उपलब्धता राज्या-राज्यात करून सर्वसामान्यांच्या फायद्याचा विचार करायला हवा. त्यासोबतच सीएसआर फंड सुरू करून त्याला मदत कशी होईल, राज्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे. काल (१४ एप्रिल) वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी प्रसंग घडला. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोक जमा झाले. यातून सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. लोकांमध्ये असे संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल अशा कोणत्याही सूचना कोणी देऊ नये. राजकीय पक्षाच्या नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की राजकीय संघर्ष काही चुकीचा नाही, पण देशावर भीषण संकट असताना राजकारण करण्याची आताची स्थिती नाहीये. म्हणून कुठल्या पक्षाचे सरकार आहे हे न पाहता या संकटावर मात करण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. वांद्रे येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंती दिनी त्यांचे स्मरण करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीला येतो. पण आंबेडकरी जनतेने योग्य खबरदारी घेऊन बाबासाहेबांच्या विचाराला साजेसे वर्तन केले, गर्दी टाळली याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच अहोरात्र संकटाशी लढणाऱ्या प्रशासन यंत्रणेचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

News Desk

रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

Chetan Kirdat

NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांची माहिती!

News Desk