मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजपाकडून राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एका जुन्या घटनेची आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.
निलेश राणे यांनी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विटरला शेअर केले आहेत. “कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो,” असं निलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो. pic.twitter.com/yYv3NLptNq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
दरम्यान, दिलीप ढवळे कुटुंबाची उद्धव ठाकरेंकडे मागणी
ढवळे कुटुंबीयांनी उस्मानाबाद येथे काल (५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन मागील वर्षभरापासून रखडलेल्या तपासावर संताप व्यक्त केला. “अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, अगदी तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमकी काय आहे प्रकरण?
ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. दिलीप ढवळे ५९ वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला होता.
ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले होते. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.