HW News Marathi
महाराष्ट्र

आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही | विखे-पाटील

मुंबई | शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली होती. राऊतांनी केलेल्या टीकेला विखेंनी ट्वीट करत “सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..!,” प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटील म्हटले, “आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील,” अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.

विखे पाटील म्हणतात, ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाच्या साक्षीने एवढेच सांगू इच्छीतो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला आणि आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय तेही लपून राहिलेले नाही,” असा हल्लाबोल केला आहे

“बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले, आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच.” असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊत यांना लगावला.

 

 

Related posts

बेस्टच्या २६ AC इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

बिहार सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं

News Desk

नाश्त्यावर ताव मारुन काँग्रेसचे उपोषण

News Desk