HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

“राज्याला २०० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन द्या”, महाराष्ट्राचं केंद्र सरकारला पत्र!

Lमुंबई | राज्यात बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, राज्यातल्या एकूण १६ जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशांनुसार राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

“महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. त्यासोबतच, लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत”, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रामध्ये महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा संदर्भ देखील देण्यात आला आहे. “राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रीय रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात आहे”, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या पत्रात म्हटले आहे.

काय आहेत मागण्या?

राज्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्यात यावी. ऑक्सिजन लिफ्टिंगची सुविधा राज्याच्या नजीक असावी. सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रीक ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रीक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रीक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रीक टन पुरवठा व्हावा. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल.

केंद्र शासनाला लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून आयएसओ टॅंकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ओडिशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल.

Related posts

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक दुसऱ्या फेरीतही आघाडीवर!

News Desk

सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते, सेनेचा केंद्राला इशारा

News Desk

अफगाणिस्तानातील दिव्यांगजनांना कृत्रिम अवयवांसाठी भारताने मदत करावी !

News Desk