HW News Marathi
महाराष्ट्र

पंचायत समिती उपसभापतींचे दालन बनले पैशांचा अड्डा

ट्रॅक्टर घोटाळ्यातील पैशाच्या देवाणघेवाणीचा व्हीडीओ मिळाला असून पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. पंचायत समिती सदस्यांचेही हात बरबटले आहेत.शेतकरी संघटनेचे(रघुनाथ दादा प्रणित) तालुकाअध्यक्ष बाळासाहेब पवार यांचा घणघणात.

तासगाव | येथील पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पाटील यांचे दालन म्हणजे वेगवेगळ्या भानगडींचा अड्डा बनला आहे. याच दालनातील अँटीचेंबरमध्ये वर्षभरापूर्वी ट्रॅक्टर घोटाळ्याचे ‘डिलिंग’ झाले होते. काही शेतकर्‍यांनी आपणाला ट्रॅक्टर मिळतील, या अमिषाला बळी पडून उपसभापतींच्या दालनात रोजगार हमी योजना विभागातील तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर याला लाखो रुपये दिल्याचा व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनाही दाखवण्यात आला आहे. मात्र त्यांनी अद्याप नांदणीकर याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. या ट्रॅक्टर घोटाळ्यात अनेक पंचायत समिती सदस्यांचेही हात थेटपणे अडकले असल्याची चर्चा आहे.

अभिनव क्रांती या संस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कमी रकमेत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे अमिष दाखवून नांदणीकर याने अनेक शेतकर्‍यांना गंडा घातला आहे. त्याच्या ‘अभिनव’ अमिषाला काही पंचायत समिती सदस्यही बळी पडले. यातून या सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील लाभार्थी शेतकर्‍यांची ओळख नांदणीकर याच्याशी करुन दिली. पंचायत समितीचा एक कर्मचारी व पंचायत समिती सदस्यच ही योजना सांगत असल्याने शेतकर्‍यांचाही यावर विश्‍वास बसला.

शेतकर्‍यांनी कसलीही खातरजमा न करता नांदणीकर याला लाखो रुपये ऍडव्हान्समध्ये दिले. हा सगळा व्यवहार पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पाटील यांच्या दालनातील अँटीचेंबरमध्ये झाला आहे. यावेळी नांदणीकर याने शेतकर्‍यांना गंडवण्यासाठी ‘ही टॅ्रक्टरची योजना दलीतांसाठी आहे. मात्र खूप प्रत्यन करुन मी तुम्हाला ट्रॅक्टर मिळवून देतोय’, असे सांगितले. हा सगळा व्यवहार पंचायत समितीमध्ये तोही पंचायत समितीच्या कर्मचार्‍याबरोबर होत असल्याने शेतकर्‍यांनीही विश्‍वास टाकत बिनधास्तपणे लाखो रुपये नांदणीकरच्या हातात दिले.

मात्र गेल्या वर्षभरात ज्या शेतकर्‍यांकडून नांदणीकर याने पैसे घेतले त्यांना ट्रॅक्टर मिळाला नाही. यानंतर शेतकर्‍यांनी पैसे परत मिळवण्यासाठी नांदणीकर याच्याकडे तगादा लावला. यावेळी नांदणीकर याने संबंधित शेतकर्‍यांना चेक दिले. मात्र यातील काही चेक खात्यावर पैसे नसल्याने तर काही चेक खातेदाराने बँकेत सांगून थांबवून ठेवल्यामुळे वटले नाहीत. बर्‍याचवेळा पैसे मागूनही नांदणीकर याने शेतकर्‍यांना केवळ गंडवागंडवीचे उत्तरे दिली.

त्यामुळे भाऊसाहेब एरंडोले या शेतकर्‍याने पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र अद्याप नांदणीकर याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार हे सोमवारी उपोषणाला बसले होते. यानंतर राष्ट्रवादी व भाजपच्या पं. स. सदस्यांना जाग आली. या सदस्यांनी नांदणीकर याच्यावर कारवाई करावी, असे पत्र रोहयोचे उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षकांना दिले आहे.

मात्र भाजप व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात लक्ष घातले असते तर दोषींवर आतापर्यंत कारवाई झाली असती. पं. स. सदस्यांचा कर्मचार्‍यांवर अंकुश उरला नाही. त्यामुळे नांदणीकरसारख्या भ्रष्ट कर्मचार्‍याचे शेतकर्‍यांना लुबाडण्याचे धाडस होत आहे. उपसभापतींच्या अँटीचेंबरमध्येच जर फसवाफसवी व ‘डिलिंग’ चे धंदे चालत असतील तर शेतकर्‍यांनी कोणावर विश्‍वास ठेवायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईकडे लक्ष…!

ट्रॅक्टर घोटाळ्यात चेतन नांदणीकर हा दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याने यासंदर्भात दिलेला खुलासा समाधानकारक नाही, असा अहवाल गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला आहे. तर पंचायत समितीच्या सदस्यांनीही नांदणीकर याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र नांदणीकर याची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यचे अधिकार मला नाहीत, अशी माहिती गटविकास अधिकारी जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम – पाटील हे या प्रकरणात काय आणि कधी कारवाई करतात, याकडे फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कर्जे मंजूर करुन देतो, असे म्हणूनही नांदणीकरने अनेकांना लुटले

चेतन नांदणीकर याला शेतकरी व गोरबरीबांना लुटायचे व्यसनच लागले आहे. ट्रॅक्टर घोटाळ्यात लाखो रुपयांवर डल्ला मारणार्‍या नांदणीकर याचे अनेक कारनामे आता बाहेर येत आहेत. ट्रॅक्टरमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक केलेल्या नांदणीकर याने उद्योगांसाठी कर्जे मंजूर करुन देतो, असे सांगून अनेकांकडून प्रत्येकी 25 हजार रुपये घेतले होते. मात्र एकाचेही कर्ज मंजूर झाले नाही. जर ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणात नांदणीकर याच्या वेळीच मुसक्या आवळल्या असत्या तर कर्ज प्रकरणात अन्य लोकांची फसवणूक झाली नसती. या सर्व प्रकाराला पंचायत समितीचे निष्क्रिय पदाधिकारी जबाबदार आहेत. कारण काही पंचायत समिती सदस्यांचे हात थेटपणे या घोटाळ्यात बरबटले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, राऊतांचा आरोप

Aprna

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk

कोल्हापूर | ‘गोकुळ’च्या राखीव गटात विरोधकांची आघाडी

News Desk