पंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजपआणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण आवताडे यांच्यासमोर आता त्यांच्या घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे.
समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडेंनी समजूत काढण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे समाधान आवताडेंसमोर मतविभागणीचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
कोण आहेत सिद्धेश्वर आवताडे?
सिद्धेश्वर आवताडे यांचाही मतदारसंघात चांगलाच संपर्क आहे. त्यांच्या ताब्यात मंगळवेढ्यातील जवळपास 50 ग्रामपंचायती, तसंच शेतकऱ्यांना पत पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांवर त्यांचं वर्चस्व आहे. सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने भाजपची मात्र अडचण निर्माण झाली आहे. आज 3 एप्रिल अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी आज शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्यास समाधान आवताडेंसाठी ही निवडणूक आणखी खडतर होऊ शकते.
भाजपच्या प्रयत्नांवर पडले पाणी?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने परिचारक आणि आवताडे गटाला एकत्र आणत अनोखी खेळी केली होती. २०१४आणि २०१९च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले परिचारक आणि आवताडेंना एकत्र करीत भाजपने समाधान आवताडेंना निवडणूक रिंगणात उतरवलं. परिचारक आणि आवताडे गट एकत्र आल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असे आडाखे बांधले जात होते. मात्र आता समाधान आवताडे यांना घरातूनच आव्हान मिळाल्याने ही निवडणूक पुन्हा रंगतदार झाली आहे.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे.त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.