मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. मनसुख हिरेन यांची गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं त्यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगितलं.
इतकंच नाही तर याप्रकरणाचा तपास केवळ सचिन वाझे यांनी केला. तीन दिवस ते रोज सचिन वाझेंसोबत जायचे आणि रात्री यायचे, हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरेन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं, ते पत्रही स्वत: सचिन वाझे यांना वकिलांकडे देऊन पाठवायला लावलं. एवढंच नाही सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा, मग मी बाहेर काढतो, असंही सांगितलं. माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असा जबाब पत्नीने दिला आहे.
सचिन वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी
फडणवीस पुढे म्हणाले की, “मनसुख हिरेन यांचं शेवटचं टॉवर लोकेशन हे गावडे यांच्या प्रॉपर्टीवर दिसतं. गावडे हे 2017 च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केलं होतं. या दोघांना अंतरिम जामीन मिळाला आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, सरळसरळ अर्थ असा आहे, त्यांची हत्या झाली आहे. एवढे भक्कम पुरावे असताना, आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे मुंबईचे प्रमुख आहे. ते पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याचे संधी आहे, रिसोर्सेस आहेत. एटीएसजवळ एवढ्या बाबी असताना त्यांना त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं जी गाडी वापरली ती त्यांच्याकडे चार महिने होती, मनसुख हिरेनला ओळखत होते हे लपवले, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक व्हायला हवी.”
सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे
राज्य सरकार पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना वाचवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, “आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबुल केलं त्यांना हटवण्याचं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याबाबत बदलले. सचिन वाझेंना पदावरुन दूर करणार नाही अशाप्रकारची भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. याचं कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठीमागे कोण कोण आहे, सचिन वाझे कोणाकोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार पाठिशी घालत आहे. यामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत. हे सरकार पूर्णपणे उघडं पडलं आहे.
हा घाबरणारा विरोधी पक्षनेता आहे का?
सभागृहापेक्षा हा अधिकारी एवढा मोठा का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. “साधे एपीआय आहेत ते. कधी डेलकरचा मुद्दा, कधी अन्वय नाईकचा मुद्दा समोर आणायचा. हे विरोधी पक्षनेत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, पण हा घाबरणारा विरोधी पक्षनेता आहे का? मी सरकारला इशारा देतो तुम्ही आम्हाला घाबरवू शकणार नाही. आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
सभागृहात गृहमंत्र्यांनी हसू करुन घेतलं
फडणवीस म्हणाले की, “आज गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली. डेलकर यांचं नाव पुढे करुन काहीतरी माहिती आहे असं भासवून विरोधकांना घाबरवू, असं सरकारला वाटलं. पण डेलकर यांची सुसाईड नोटच मी घेऊन आलो. त्यामुळे त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. आज गृहमंत्र्यांनी हसं करुन घेतलं.”
अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी जरुर करा
अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला. “मी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचं थोबाड अक्षरश: काळं झालं आहे. जो तपास केला, त्यावर ताशेरे ओढले ते गृहमंत्री विसरले वाटतं. गृहमंत्र्यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही हे उत्तर आहे. तरीही त्यांना खुलं आव्हान दिलं आहे, अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी माझी चौकशी जरुर करावी, पण अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
हिरेन कुटुंबाना संरक्षण द्या
सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे असतान सरकार त्यांच्या मागे का उभं आहे हा माझा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले. “माझ्या माहितीनुसार सचिन वाझे यांनी दोन वेळा मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. हिरेन कुटुंबाला संरक्षण द्यायला हवं,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.