HW News Marathi
महाराष्ट्र

राजभवन मुंबई येथील नव्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई | राजभवन मुंबई येथील नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार सभागृहाचे (हॉलचे) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज (११ फेब्रुवारी) उद्‌घाटन झाले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

आपल्या संविधानानुसार ‘आपण भारतीय लोक’ देशाच्या सार्वभौमत्वाचे आधार आहोत. दरबार हॉलचा हा उद्घाटन समारंभ म्हणजे मला देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव वाटतो. जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी कामांचं एक प्रभावी केंद्र बनेल, याची मला खात्री आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती भवनाप्रमाणे हे राजभवनही आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या जनमानसातील आशा-आकांक्षांचे संवैधानिक प्रतीक ठरले आहे. याचा इतिहास ब्रिटिश सत्तेच्या वर्चस्वाशी बांधलेला असेलही, परंतु वर्तमान आणि भविष्य मात्र महाराष्ट्रासह पूर्ण देशाच्या गौरवगाथेशी जोडले गेले आहेत असे कोविंद यांनी सांगितले.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी दरबार हा शब्द राजसत्तेशी जोडलेला होता. मात्र, हा दरबार लोकशाहीशीच संबंधित आहे. लोकशाही व्यवस्थेत सुशासनासाठी सर्वात महत्त्वाची असते ती पारदर्शकता. दरबाराच्या व्यवस्थेत कोणतीही गोष्ट व्यक्तिगत नसते आणि गोपनीयही नसते. आता जनसेवक हे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा पायंडा पडत चालला आहे. अशाप्रकारे, नवीन संदर्भात, हे नवे दरबार सभागृह, आपल्या नवभारताचे, नवमहाराष्ट्राचे आणि चैतन्यमय लोकशाहीचे नवे प्रतीक आहे, असे कोविंद यांनी सांगितले.

ऐतिहासिक दरबाल हॉल या वारसा वास्तूची वैशिष्ट्ये जपून ही नवनिर्मिती करण्यात आली आहे, याचा विशेष आनंद वाटतो. परंपरा सांभाळून काळाच्या गरजेनुसार आधुनिकतेची कास धरणे हे विवेकाचे लक्षण आहे असे ते म्हणाले .

दरबाल हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याची जनता आणि सरकारचे अभिनंदन करत राष्ट्रपती म्हणाले की, महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे खास वैशिष्ट्य आहे, जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी १२ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्र ही आध्यात्मिकतेची आणि त्याचवेळी अन्यायाविरुद्धच्या शौर्यपूर्ण संघर्षांची भूमी आहे. ही देवभक्तांची आणि देशभक्तांचीही भूमी आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. महाराष्ट्र हे भारताचे महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अगत्यपूर्वक अतिथीसत्कार ही महाराष्ट्रातील लोकांची विशेष ओळख आहे असे सांगत यासह अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे भारतातील आणि भारताबाहेरीलही अगणित लोकांना महाराष्ट्राला पुनःपुन्हा भेट द्यावीशी वाटते असे ते म्हणाले .

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या कारकिर्दीत राजभवन परिसरात नैसर्गिक वैविध्याची जपणूक केली. काही वर्षापूर्वी सापडलेल्या राजभवनातील ऐतिहासिक तळघराच्या वापराबाबतची त्यांची संकल्पना यावेळी स्पष्ट केली. महाराष्ट्रातील क्रांतीकारांची माहिती देणारी छायाचित्रे बंकरमध्ये लावणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहोत हेच या वास्तूचे वैशिष्ट्य आहे आणि जुनी वैशिट्ये कायम ठेऊन नुतनीकरण करण्याचे आवाहन इथे पेलले आहे आणि पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे,  असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

दरबार हॉलचा इतिहास

राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून 225 इतकी आसन क्षमता असलेल्या हॉलची आसन क्षमता आता ७५० इतकी झाली आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉलचा वापर हा शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ यासाठी केला जाऊ लागला.

शंभर वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या लाटा आणि वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.

नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी संपात उद्धव यांची उडी

News Desk

संजय राठोड यांचा राजीनामा काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही- मुख्यमंत्री

News Desk

‘माझ्या कुटुंबीयांचं काश्मीरशी नातं’ काँग्रेस नेते राहुल गांधीचं वक्तव्य!

News Desk