HW News Marathi
महाराष्ट्र

शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, पंतप्रधानांचे पुणेकरांना आवाहन

पुणे | शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना केले आहे. पंतप्रधान हे आज (६ मार्च) पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो उद्घाटन केले आहे. पंतप्रधान पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर पंतप्रधानांनी पुणे मेट्रोच्या पुढील कामाच्या आराखड्याची पाहणी देखील केली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी पुणे मेट्रोतून प्रवास करण्यापूर्वी स्व:ता तिकीट काढले. आणि मेट्रो प्रवासादरम्यान मोदींनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला  

 प्रधानमंत्री म्हणाले, “पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतुकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.”

नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा

देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतुकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.

शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर बनवावे लागेल

एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतुकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

पर्यावरणपूरक इंधनाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख

शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख ‘ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रँडीगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा

पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले. पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाविरोधात केलेल्या आंदोलनामूळे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

News Desk

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढू, प्रसाद लाडांचा इशारा

News Desk

राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’) चे सहकार्य मोलाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna