मुंबई | राज्यात रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह ५ मागण्या केल्या आहेत. काल (१३ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रात लस पुरवण्याचा वेग वाढवण्याची विनंती केली होती. तसेच, हवाई मार्गानेही महाराष्ट्रात लस पुरवण्याचीही मागणी केली होती.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ पानी पत्रं लिहत मुख्यमंत्र्यांच्या मदतीलाच ते धावून आले आहेत. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. तसेच या पत्रातून पंतप्रधानांकडे पाच मागण्याही करण्यात आल्या आहेत.
राज ठाकरेंचा मोदींना सवाल
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना या पत्रातून केला आहे.
सर्व वयोगटातील लोकांचं लसीकरण करा
कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक राज्यांचं धोरण असावं – राज ठाकरे
कोरोनामुळे राज्यांवर वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असं राज यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राची स्थिती सर्वात बिकट – राज ठाकरे
गेल्यावर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिका रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज यांनी पत्रात लिहिलं आहे.
राज यांच्या पाच मागण्या
>> महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या
>> राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात
>> सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी
>> लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, आणि
>> कोविड उपचाररासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.