मुंबई | शिक्षण क्षेत्रात काळानुरुप बदल होत आहे. पण येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना रॅमन मॅगसेसे पुरस्कार-2018 सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्या सारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकामधील भावनिक बुध्दयांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे ब्रॅंड काम करावे जेणेकरुन त्यांच्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
Ramon Magsaysay Award 2018 winners Sonam Wangchuk & Dr. Bharat Vatvani felicitated by the GoM. Moving forward, Maharashtra need expertise to enhance its true potential. Urged these gentlemen to become ‘Brand Ambassadors’ of Maharashtra, guiding our fruitful future. pic.twitter.com/SfvOi0VTks
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 4, 2018
रॅमन मॅगसेसे पुरस्कार-2018चे विजेते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. आशियातील नोबल पुरस्कार समजला जाणारा 2018 साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सत्कार कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विविध विदयापीठांचे कुलगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.
विनोद तावडे यावेळी म्हणाले की, या दोन्ही रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांनी स्वत:शी संवाद साधून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मातीशी नाळ जुळणारे शिक्षण असेल तर विदयार्थी अधिक त्या शिक्षणामध्ये रस घेतात हे दिसून आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना नेमके काय आवडते आहे हे जाणून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात काम करताना केला. तर डॉ. भरत वाटवानी यांनी आपण समाजाचे देणे लागत असल्याने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून मानसिक रुग्णांना आश्रय दिला. आज भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीयांमध्ये असलेले भावनिक बुध्दयांक चांगले मानव संसाधन निर्माण करु शकते आणि हेच मानव संसाधन भारताला विविध क्षेत्रात येणाऱ्या काळात आघाडीवर ठेवेल.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात विदयार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढणे आवश्यक आहे. पण हे करीत असताना विदयार्थ्यांचा नुसता बुध्दयांक वाढून उपयोग नाही तर भावनिक बुध्दयांक वाढणेही तितकेच आवश्यक आहे. आजच्या शिक्षणपध्दतीत भावनिक बुध्दयांकाची सांगड घालणे म्हणूनच आवश्यक बनले असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
सोनम वांगचुक यावेळी म्हणाले की, शिक्षणात सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. मुलांना देण्यात येणारे शिक्षण भौगोलिक स्थिती यावर बरेचसे अवलंबून असते. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपध्दती प्रमाणे बदल केल्याचेही वांगचुक यांनी यावेळी सांगितले.
डॉ. भरत वाटवानी यावेळी म्हणाले की, सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला. पण समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करु शकलो पाहिजे या विश्वासाने काम सुरु केले. आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात पण अजूनही आपण मानसिक आजाराचे रुगण आहोत हे आपण पटकन मानायला तयार होत नाही त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विदयार्थ्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
सोनम वांगचुक यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात काम केले आहे. निसर्ग, संस्कृती,विज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे आईस स्टुपा बनवले, लाखो लोकांना /मुलांना प्रयोग करण्याची प्रेरणा दिली आहे. सोनम वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधले बहुतांश विद्यार्थी सरकारी परिक्षांमध्ये नापास व्हायचे. १९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण अत्यल्प होते तेच आता जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
भरत वाटवानी यांनी कफल्लक होऊन रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली. डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी कफल्लक झालेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये घेऊन यायचे. त्यांच्यावर मोफत उपचार करायचे. डॉ. वाटवानी यांनी अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला. त्यांच्या मनोविकारावर उपचार करुन त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली. भरत वाटवानी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवं जीवदान दिल्याने त्यांना मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.