HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राजा प्रजेत गेला पाहिजे मात्र मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब म्हणत घरी बसले आहेत- रावसाहेब दानवे

पैठण | परतीच्या पावसाने राज्यातील खासकरुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दानवे आज (१७ ऑक्टोबर) पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय? अशा शब्दांत दानवेंनी टीका केली आहे. या स्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. ही आपली माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असं दानवे म्हणाले. आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोकेशन मोबाईल उघडून पाहातो आणि खिशात ठेवतो, असंही दानवे म्हणाले.

आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले.
राजा प्रजेत गेला पाहिजे. प्रजेचं दु:ख वाटून घेतलं पाहिजे. त्या प्रजेचं कुटुंब हेच आपलं कुटुंब वाटलं पाहिजे. प्रजेच्या दु:खामध्ये सहभागी झालं पाहिजे. मात्र मुख्यमंत्री हे मी आणि माझे कुटुंब असं म्हणत घरात बसले आहेत, असं दानवे म्हणाले.

Related posts

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

होर्डिंग प्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला अटक

अपर्णा गोतपागर

मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

News Desk