HW News Marathi
महाराष्ट्र

बिहार सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं

पुणे | बिहार आणि महाराष्ट्र यांचा वाद फार जुना आहे. बिहारमधून कामगार कामाच्या शोधासाठी मुंबईत महाराष्ट्रात येतात. कायम राज्याने या सर्वांना सहानुभूती दिली प्रेम दिले. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही महत्त्वाच्या बाबी फेसबुक पोस्ट द्वारे मांडल्या आहेत.

काय आहे पोस्ट ?

महाराष्ट्रात गच्च भरुन येणाऱ्या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉकडाऊनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित कामगार/मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचं लक्षात येतं. वास्तविक लॉक-डाऊनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्यावेळीही प्रेम दिलं होतं आणि आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने आपल्या मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली, असं म्हणावं लागेल. मी आज जाणीवपूर्वक या विषयावर लिहितोय की बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठं दिसला नाही. बिहार सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं.

‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडं हॉस्पिटल नाहीत’, असं एक वक्तव्य कोविड-१९ च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. एक सत्ताधारी मंत्री असं बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येते.बिहारमध्ये विकास झाला नाही, कामधंदा नाही, उद्योगधंदे नाहीत, म्हणून आम्हाला महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचं बिहारमधील अनेक लोक मला सांगतात. गेल्या काही दिवसांपासून मी बिहारमधील नेत्यांचं राजकारण पाहतोय पण ते काही विकासाच्या दिशेने सुरू आहे, असं वाटत नाही.

एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडून जी ताकद खर्च होते त्यातील काही टक्के जरी ताकद आणि वेळ विकासावर खर्च केला असता तर आज बिहारमधील युवांना उवजीविकेसाठी महाराष्ट्रासारख्या अन्य राज्यात जावं लागलं नसतं. तसंच विकसित भारताचं स्वप्नही साकार झालं असतं. विकसित भारत म्हणजे केवळ महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पंजाब अशा मोजक्याच राज्यांचा विकास नसतो. तर प्रत्येक राज्याने त्यात आपलं योगदान देणं गरजेचं आहे.

स्पर्धा ही विकासाची व्हायला हवी. पण महाराष्ट्रासारखी काही राज्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवत असताना बिहार मात्र त्यापासून कोसो मैल लांब आहे. तिथल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेंव्हा बोलतात तेंव्हा हसू येतं. बिहारी लोक खासकरून युवक हे कष्टाळू आणि चिवट आहेत. त्यांच्यात हुशारीही आहे, पण तरीही विकास का होत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात युवा शक्तीची ताकद करपून जातेय. म्हणून माझं बिहारच्या युवांनाही आवाहन आहे की ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनीच आता स्वतःहून पुढं यावं.

तुमचा भविष्यकाळ तुम्हीच बदलू शकता, पण तुम्हीही फक्त पहात बसलात तर काही नेत्यांच्या फक्त सत्तेच्या राजकारणात तुमच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न कधी साकार होईल, हे कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही.राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करायचं असतं, पण बिहारमधील राजकारणी मंडळी कशाचं राजकारण करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण त्यांच्या या राजकारणामुळं जनता मात्र आहे त्या ठिकाणीच राहिलीय. लोकांच्या प्रगतीत तसूभरही वाढ झाली नसल्याचं दिसतं. दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या दुर्दैवी घटनेचंही राजकारण कसं करावं हे बिहारमधील नेत्यांनाच जमतं. अशा घटनेतही ते आपला हात धुवून घेतात.

कोरोनाच्या काळात बिहारमधील स्थलांतरीत कामगारांची महाराष्ट्राने कशी काळजी घेतली याच्या अनेक बातम्या, व्हिडिओ आपण पाहिले आणि हेच लोक बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांचे कसे हाल झाले हेही पाहिलं, तरीही हेच लोक याबाबत मात्र काही बोलत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं.त्या-त्या राज्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. पण नोकऱ्या निर्माण करण्याची ताकदही त्या राज्यातील नेत्यांमध्ये पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये अशी ताकद दिसते, ती बिहारसारख्या नेत्यांमध्ये का नाही हाही प्रश्न आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३८ वर, तीन नव्या रुग्णांची नोंद

News Desk

कोरोना प्रतिबंधक साधनांचा पुरवठा बंद होणार यावर रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

News Desk

Antilia Bomb Scare Case :  स्फोटकांनी कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

News Desk