मुंबई | तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. त्यामुळे या वादाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याच वादाचा हवाला देत शिवसेनेनं भाजपाला धारेवर धरलं आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” अशा शब्दात शिवसेनेनं आजच्या (२१ जानेवारी) सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱया गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील!
भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. ‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. भगवान शंकर आणि नारदाच्या संवादातून श्रीरामाचा उल्लेख उपहासात्मक पद्धतीने झाल्याचे ‘तांडव’ भाजपने सुरू केले. हिंदू देवदेवतांबाबत कोणत्याही प्रकारची अपमानास्पद विधाने शिवसेनेने कधी खपवून घेतली नाहीत.
एम.एफ. हुसेन हे नक्कीच महान चित्रकार होते, पण त्यांनी हिंदू देवतांची चित्रे ज्या पद्धतीने रेखाटली त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. वाद इतका पेटला की, एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले. त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱया त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा घोर अपमान जितका गोस्वामीने केलाय तितका अपमान पाकडय़ांनीही केला नसेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. ऍण्टनी यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद यांनीही बुधवारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची तसेच ‘सरकारी गोपनीयता अधिनियमा’अंतर्गत कारवाई होण्याची मागणी केली आहे.
हा सगळा प्रकार म्हणजे देशद्रोहच असून संसदेच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा लावून धरू असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. सरकारने याप्रकरणी जे काही सत्य आहे ते बाहेर आणायला हवे. एकतर ‘पुलवामा’तील आमच्या सैनिकांची हत्या हा देशांतर्गत राजकीय कट होता आणि लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी या 40 जवानांचे रक्त सांडवले गेले असे आरोप त्यावेळीही झाले. आता अर्णब गोस्वामीच्या व्हॉटस्ऍपवरील जे काही संभाषण बाहेर आले आहे, ते या आरोपांना बळकटी देणारेच आहे असे म्हणायला जागा आहे. हे सगळे पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही कपाळावर हात मारून घेत असतील. पुन्हा भारतीय जनता पक्षाने यावर ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुपिते या गोस्वामीने फोडली. यावर भाजप तांडव का करीत नाही? चीनने लडाखमध्ये घुसून हिंदुस्थानच्या जमिनीचा ताबा घेतला, चीन मागे हटायला तयार नाही यावर ‘तांडव’ का होत नाही?
गोस्वामीला गोपनीय माहिती पुरवून राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करणारे नक्की कोण होते हे जरा कळू द्या! गोस्वामीने 40 जवानांच्या हत्येवर आनंद व्यक्त करणे हा देश, देव आणि धर्माचाच अपमान आहे. ‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱया गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या भूमिकांवर आक्षेप घ्यावे असे काहीच नाही, पण हिंदुत्व आणि भारतमातेचा अपमान फक्त ‘तांडव’पुरताच मर्यादित नाही. श्रीमान मोदी हे भगवान विष्णूंचे तेरावे अवतार आहेत, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगणे हा ‘तांडव’ पद्धतीचाच हिंदुत्वाचा अपमान आहे. ‘तांडव’ सीरिजमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी असतील आणि त्यात हिंदुत्व, आमच्या देवदेवतांचा अपमान असेल तर धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्दय़ावर कठोर कारवाई होईलच.
मुळात श्रद्धास्थाने कोणत्याही धर्माची असोत, त्यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह उल्लेख करणे चुकीचेच आहे. ‘तांडव’मधील कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे व तो का आहे यावर चर्चा व्हायला हरकत नाही, पण अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. पुलवामा हल्ल्यासंदर्भातील अर्णबचा संवाद हा पाकडय़ांच्या सोयीचाच आहे व इम्रान खान यांनी त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी हे भलतेच साटेलोटे आहे. भाजपातील काही शेंबडय़ांनी आता अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, अर्णबचे गुप्त ‘चॅट’ उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबडय़ांनो, मुळात तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला. उलट मुंबई पोलिसांनी देशावर उपकारच केले आहेत. हे अस्तनीतले साप देशाच्या मुळावरच आले होते. त्यांचा फणा मुंबई पोलिसांनी ठेचला तर भाजपच्या शेंबडय़ांना संताप का यावा? आम्हाला आश्चर्य वाटते की, देशातील तमाम तथाकथित राष्ट्रभक्त म्हणवून घेणाऱया मीडियाचे. हे लोक स्वतःला राष्ट्राचा चौथा स्तंभ की काय समजतात ना!
मग त्यांच्यातल्याच एका वाळवी किडय़ाने देशाचा स्तंभ पोखरला, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली गुपिते फोडली, त्याने देशद्रोहच केला तरी ‘मीडिया’ थंड का? एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे प्रकरणांवर चोवीस तास वखवखणाऱयांना अर्णबच्या देशद्रोही कृत्याची घृणा सोडा हो, पण संताप येऊ नये याचेच दुःख वाटते.
शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.