HW News Marathi
देश / विदेश

फ्रान्समधील हल्ल्यानंतर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना सामनातून सुनावले खडे बोल

मुंबई | फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मासिकात २०१५ मध्ये छापून आलेलं मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र, इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी विद्यार्थ्यांना दाखवलं. यावरून या शिक्षकाची १६ ऑक्टोबरला गळा चिरून हत्या झाली. त्यावरून शिवसेनेनं धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

कोणता धर्म अशा प्रकारे माणसांची कत्तल करण्याची परवानगी देतो? पण धर्माचे नाव घेऊन अधर्म करणाऱ्या अशा कृत्यांना जिहादचे नाव देऊन त्यालाच कोणी धर्म म्हणत असेल तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. धर्म कुठलाही असो, ‘माणुसकी’ हाच त्याचा गाभा आणि मुख्य आधार असायला हवा. माणसे मारण्याच्या अमानुषतेला धर्मात स्थान असूच शकत नाही. त्यामुळेच तर प्रत्येक धर्म माणुसकी, प्रेम, सेवा, त्याग अशा मूल्यांची शिकवण देतो, अशी भूमिका आजच्या (३१ ऑक्टोबर) सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

कुठल्याही धर्माची असो, ती चूकच आहे. त्याची जाणीव सर्वच धर्मीयांनी ठेवायला हवी. श्रद्धेच्या विषयांबाबतही काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत. अफगाणिस्तानातील बामियानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी प्राचीन बुद्धमूर्ती स्फोटके लावून उडवल्या, कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंची हत्याकांडे घडवली त्या वेळी ‘बायकॉट तालिबान, बायकॉट टेररीझम’ अशा मोहिमा आता रस्त्यावर उतरणाऱ्यांनी का राबवल्या नाहीत?, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

ज्या नीस शहरात तीन जणांचे ताजे हत्याकांड झाले त्याच शहरात चार वर्षांपूर्वी एका अतिरेक्याने स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसवून 84 निरपराधांचे जीव घेतले होते. त्याआधी पॅरिसमधील साखळी बॉम्बस्फोटांतही 130 जण मृत्युमुखी पडले. ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने पैगंबरांचे व्यंगचित्र छापले तेव्हादेखील त्या साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. त्यातही 12 जण मारले गेले. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये असे छोटेमोठे 36 दहशतवादी हल्ले झाले.

बुरखाबंदी, मशिदींना टाळे, बाहेरच्या इमामांना प्रवेशबंदी असे अनेक कठोर निर्णय फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी अलीकडच्या काही वर्षांत घेतले. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यात फ्रान्सला अजूनही यश आले नाही. आता दहशतवाद्याने केलेला शिक्षकाचा शिरच्छेद आणि नीसमधील तिघांचे हत्याकांड यामुळे ‘निधर्मी’ अशी ओळख सांगणाऱ्या फ्रान्समधील धार्मिक तेढ आता विकोपाला गेली आहे.

1789 मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची शिकवण फ्रान्सने जगाला दिली. त्याच फ्रान्समध्ये आता राजरोसपणे बंधुभावाचा मुडदा पडताना दिसतो आहे. धर्माच्या नावाखाली माणसांची आणि माणुसकीची कत्तल होते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने दिले वेळापत्रक – ३ दिवस विरोधक, ४ दिवस समर्थक तर १ दिवस केंद्र सरकार मांडणार आपली बाजू

News Desk

रमजानच्या काळात अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई होणार नाही  

News Desk

सरकारी बँकांचं खासगीकरण, SBI सह देशातील अनेक बँकांचे कर्मचारी २ दिवसांच्या संपावर

News Desk