HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या शुभ्र दाढीच्या तेजाने देशातील संकटांचा अंधार दूर होईल – सामना

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार हे ऐकलं की नक्कीच मोठी घोषणा केली जाणार असे सगळे समजून जातात. मोदींनी मंगळवारी (२० ऑक्टोबर) देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाचं संकट अद्याप गेलं नसून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.

मोदींच्या ८ ते १० मिनिटांच्या भाषणात त्यांनी फक्त कोरोनावरच भाष्य केलं. अर्थात यावेळी ते महाराष्ट्रात उद्भवलेली पूर स्थिती किंवा देशाची विस्कटलेली आर्थिक घडी यावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण या सगळ्यांवर पाणी फेरले. त्यांच्या या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या (२२ ऑक्टोबर)अग्रलेखात उपरोधिक टीका करण्यात आली आहे.

“पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत खऱ्या संकटाची जाणीव करुन दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल”, असा चिमटा अग्रलेखात काढण्यात आला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!

पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला.

मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते. लॉक डाऊन संपलाय, पण कोरोना संपलेला नाही. देश अजूनही कोरोनाशी लढतोय. ही माणूस जगविण्याची, मानवतेची लढाई असल्याचे त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते.

मंगळवारच्या त्यांच्या संबोधनात काही वेळा ‘रामचरित मानस’चा संदर्भ त्याच भावनेतून आलेला दिसला. कोरोनाचा धोका समजण्यासाठी पंतप्रधानांनी ‘रामचरित मानस’चा संदर्भ घेतला. लॉक डाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ‘महाभारत’ काळात देशाला नेले होते. महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी 18 दिवस लागले होते. कोरोनाला हरवण्यासाठी 22 दिवस लागतील, असा शंख मोदींनी फुंकला होता, पण सात महिन्यांनंतरही हे युद्ध संपले नसल्याचा शंख नव्याने फुंकण्यात आला.

आहे. मोदी यांनी लोकांना सांगितले आहे, ‘हात साबणाने स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. दोन फुटांचे सुरक्षित अंतर एकमेकांत ठेवा.’ पंतप्रधानांनी हे सर्व पालकत्वाच्या नात्याने सांगितले व लोकांनी त्यांचे ऐकायला हवे. अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. एक छोटीशी चूक आपला आनंद मारू शकते. मी आपल्या सगळ्यांना सुरक्षित व आनंदी पाहू इच्छितो. जीवनात कर्तव्यपालन करताना सावधानता बाळगली तरच जीवनात ‘खुशी’ची बहर कायम राहते, असा लाखमोलाचा संदेश मोदींनी दिला व तो बरोबर आहे. मोदींचे कालचे भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर एका चिंताग्रस्त पालकाचे होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेत जे संबोधन उद्धव ठाकरे करतात त्याच पद्धतीचे राष्ट्रीय संबोधन श्री. मोदी यांनी दिल्लीत बसून हिंदीतून केले. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणास नाके मुरडणाऱयांनी मोदींच्या भाषणास दाद दिली आहे. मोदी यांचे भाषण लोकांना आवडणार नाही व सोशल मीडियावर ‘डिसलाइक’चा पाऊस पडेल, असे भय वाटल्याने ‘डिसलाइक’चे बटनच ‘ब्लॉक’ केले. पण तसे करण्याची गरज नव्हती. मोदींचे 10-12 मिनिटांचे भाषण माहितीपूर्ण होते. श्री. मोदी यांचे राष्ट्रीय संबोधन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काळजीपूर्वक ऐकले असेलच. लोक गर्दी करतील अशी ठिकाणे इतक्यात उघडता येणार नाहीत.

कारण लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. हे देशाचे पंतप्रधान सांगतात. तेव्हा त्याचा विचार करायला हवा. थोडीशी लापरवाही जीवनाची गती थांबवू शकते, इतका स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी दिला आहे. बाजारात हळूहळू उलाढाल वाढत आहे. आर्थिक उलाढालीत तेजी येत असल्याची माहिती मोदींनी दिली. ही गती जास्त कशी वाढेल? कोरोनामुळे जो बेरोजगारीचा भस्मासुर

उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला. पंतप्रधानांनी संध्याकाळी सहाच्या भाषणात चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर बोलावे, आमच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना उचलून कधी बाहेर फेकणार ते सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. पण त्यापैकी एकाही विषयाला मोदी यांनी स्पर्श केला नाही. मोदी राजकीय व प्रशासकीय असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी आध्यात्मिक मार्गाने राष्ट्राचे प्रबोधन केले. देशात रिकव्हरी रेट वाढतो आहे. मृत्यूदर कमी झाला आहे.

दुनियेतील साधनसंपन्न देशांच्या तुलनेत आपण जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आमच्या देशात प्रतिलाख साडेपाच हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेत हे प्रमाण 25 हजारांवर आहे. हे खरे असले तरी अमेरिकेत कोरोना कारणाने जे लोक बेकार झाले आहेत, त्यांच्या बँक खात्यांवर ट्रम्प सरकार जगण्यासाठी भत्ता जमा करीत आहे, हेसुद्धा तितकेच खरे. कोरोनावरील लसीचे संशोधन सुरू आहे. सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱया संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचा आज एकदिवसीय अमरावती दौरा, विदार्भात मोठा पोलीस बंदोबस्त

Aprna

“बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग”, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान!

News Desk

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk