HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच – सामना

मुंबई | जगावरील कोरोनाचे संकट अद्यापही टळले नाही आहे. त्यामूळे मोठ्या आनंदात जे सण, उत्सव साजरे केले जातात त्यावर बंदी आली आहे. असे असताना शिवसेना ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा करणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून आपली या वरील भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सांगितले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

“लोकांनी ईद साजरी केली नाही, सार्वजनिक गणेशोत्सवात संयम राखला. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता, पण संकटच असे गंभीर आहे की, आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत. आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“हिंदुस्थानात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत 85 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण समोर आले. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत पंधरा हजार लोक कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे ‘अनलॉक-5’ मध्येही सगळे आलबेल आहेच असे नाही. महाराष्ट्रातले दोन प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे कोरोना संक्रमित आहेत. हे चित्र काही आशादायक नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हाच कोरोनावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. मास्क ही ढाल, तर सामाजिक दुरी ही तलवार आहे असंही सांगण्यात आलं आहे.

“महाराष्ट्र सरकार राज्यातील ‘अनलॉक’ केंद्राच्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार करीत आहे व तेच योग्य आहे. लॉकडाउन २ आणि ३ चे पालन काटेकोरपणे झाले असते तर बऱ्याच गोष्टी सुरळीत झाल्या असत्या,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आजही कोरोनाग्रस्त आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील स्थिती अद्यापही संपूर्ण नियंत्रणाखाली आलेली नाही व पंतप्रधान मोदी हे सर्वच बाबतीत ‘जादूगार’ किंवा सुपरमॅन असले तरी कोरोनास पळवून लावणारी जादूची छडी त्यांच्या हाती नाही,” अशी उपहासात्मक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

“अनलॉक-५’ मध्ये नव्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. चांगली बातमी अशी की मुंबईतील डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे, पण मुळात मुंबईची उपनगरीय रेल्वे सुरू झाली आहे काय? पुण्याच्या लोकल सेवेस सरकारने परवानगी दिली, पण मुंबईचा नोकरदार वर्ग आजही लोकलच्या प्रतीक्षेत फलाटावरच उभा आहे. उद्योगधंदे उघडण्यास परवानगी दिली, पण कामगार कामाच्या ठिकाणी कसा पोहोचणार? म्हणजे रेस्टॉरंट उघडा असे सांगितले, पण रेस्टॉरंटमध्ये काम करणारा नोकरवर्ग त्या ठिकाणी कसा पोहोचणार? याचे नियोजन नीट झालेले दिसत नाही. गर्दी टाळता यावी म्हणून दिवस व रात्र अशा दोन वेळांत काम व्हावे. त्यामुळे काही नियम पाळता येतील, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण हे सर्व कधी व कसे घडणार?,” असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

“हे सर्व ठीक असले तरी अनलॉक-५ मुळे लोकांचे जनजीवन थोडे तरी रुळावर यावे अशी अपेक्षा आहे. नोकरीधंद्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था ठेवा बाजूला, सामान्यांची, मध्यमवर्गीयांची तोळामासाची अर्थव्यवस्थाही मातीमोल झाली आहे. सर्वत्र अंधकार आणि निराशा आहे. त्या निराशेतून लोकांना बाहेर काढले नाही, तर महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेस गालबोट लागेल,” अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेण खाल्ल्यानंतर…खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो! निलेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टिका…

News Desk

“…तर भाजपसमोर महाविकासआघाडीचा निभावही लागणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

News Desk

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्याचे पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे”

Manasi Devkar