HW News Marathi
देश / विदेश

काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील- सामना 

मुंबई |  ‘बिहारमध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार आणि त्यांचा पक्ष कुठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल’ अशा शब्दांत शिवसेनेने आजच्या (१२ नोव्हेंबर) अग्रलेखातून थेट नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचं पुन्हा एकदा कौतुक करण्यात आले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे. बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकडय़ांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपस लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे.

अटीतटीच्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस 125 जागा मिळाल्या. विधानसभा 243 आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत 122 चे आहे. पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस 110 जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा 100 ते 300 च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघांत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून ‘जागा’ लाटल्या, असा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. ‘राजद’ने 119 विजयी उमेदवारांची यादीच घोषित केली. पण निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. त्यातले सत्य काय ते नितीशबाबूंनाच माहीत. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा काैल आहे काय? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशपुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल. जनता दल युनायटेड पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे.

भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी पिंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले त्यामुळे नितीशकुमार यांच्या 20 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही.

भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील. पण त्या बादशाहीवर ‘110’ आकडा असलेल्या भक्कम विरोधी पक्षाचा अंकुश राहील. तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट, आतापर्यंत ८० हून अधिक जण जखमी

News Desk

मद्रास हायकोर्टाने फटकाल्यानंतर निवडणूक आयोगाने विजय मिरवणुकांवर घातली बंदी

News Desk

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

News Desk