HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

मुंबई | पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावात झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात ३ जणांनी विनााकारण जीव गमावला. कोणतीही शहानिशा न करत केवळ अफवेच्या जोरावर सगळ्यांनी मिळून त्यांना क्रुर मारहाण केली. मात्र, या प्रकरणाचे राजकारण झाले ते धर्मावरुन. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितले की याचे धर्मावरुन राजकारण करणे थांबवा. सामनामधील आजच्या अग्रलेखात याच विषयावर साधुची भगवी वस्त्रे रक्ताने भिजली त्याचे राजकारण करु नका असे म्हचले आहे. वाचा सविस्तर सामन्याच्या आजच्या अग्रलेखात…

सामना अग्रलेख

पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे . असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना ? पण त्यातील गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दिला आहे . आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान , अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे . त्यातूनच चंद्रपूर , धुळे आणि डहाणू – पालघरसारख्या घटना घडत आहेत . महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये .

पालघर परिसरात दोन साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. या सर्व घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच! हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी यासही हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साधूंची हत्या जितकी निषेधार्ह, साधूंचे रक्त सांडणे जितके निर्घृण आणि अमानुष तितकेच अमानुष या प्रकरणास धार्मिक रंग देण्याचे कारस्थान आहे. साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत. पालघरमधील गडचिंचले या गावात गुरुवारी रात्री जमावाने दोन साधूंना मारले. गावात ‘लॉक डाऊन’चा फायदा घेऊन चोर शिरले या अफवेतून हे घाणेरडे प्रकरण घडले आणि दोघांना प्राण गमवावे लागले. साधूंच्या वेषात पंचक्रोशीत चोर फिरत असल्याची अफवा गावात होती व नेमकी या साधूंची गाडी गावात आली. ‘लॉक डाऊन’च्या काळात या साधूंना महाराष्ट्राची सीमा पार करायची होती व तेच त्यांच्यासाठी घातक ठरले. या साधूंना गुजरातमध्ये जायचे होते. कोणी सांगतात, सिल्वासाला जायचे होते, पण हे भगव्या वस्त्रांतील साधू असूनही त्यांना अडवले व परत पाठवले. या साधूंना तेथील प्रशासनाने ताब्यात ठेवून महाराष्ट्र सरकारला कळवले असते तर कदाचित मार्ग निघाला असता, पण तसे घडले नाही व साधूंना प्राण गमवावा लागला. जेथे ही दुर्घटना घडली तो आदिवासीबहुल परिसर आहे. गुजरातच्या सीमेवरील डहाणूजवळ हे घडले. जे घडले ते भयंकरच आहे व पोलिसांनी तत्काळ हल्ला करणार्‍याया जमावात सामील झालेल्या शंभरावर लोकांना अटक केली. त्यामुळे पोलीस काय करीत होते? सरकार झोपले होते काय? हे

प्रश्न निरर्थक

आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे एक कार्यक्षम मंत्री आहेत. याप्रकरणास धार्मिक रंग देऊन चिथावणी देणार्‍यायांचे कारस्थान राज्याच्या गृहमंत्र्यांनी हाणून पाडले आहे. ज्यांची हत्या झाली ते व ज्यांनी हत्या केली तो जमाव एकाच धर्माचा आहे. दोन्ही बाजूला हिंदूच आहेत. त्यामुळे धार्मिक रंग देऊ नका असे ठणकावून सांगण्यात आले. हे सरळ सरळ माथेफिरू जमावाचे मॉब लिंचिंगच होते व गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास गृहमंत्री देशमुख यांनी दिला हे महत्त्वाचे. पण अनेक राजकीय भक्त मंडळींचे दुःख असे की, महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली, समाज माध्यमांवर धार्मिक भेदाभेदीचे विष पेरले गेले तरीही महाराष्ट्रात धार्मिक उन्माद उसळला कसा नाही? त्यामुळे अनेकांना वैफल्य येणे साहजिकच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धुळय़ात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय? गोमांस भक्षणप्रकरणी दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशात सतत मॉब लिंचिंग झाले, पण मरणारे मुसलमान होते म्हणून बेगडी हिंदुत्ववादी उन्मादाने नाचत होते. हत्या कोणाचीही असो, ती वाईटच. एखाद्याच्या हत्येने जो आनंद व्यक्त करतो ती एक विकृतीच मानावी लागेल. मग आपल्यात व ओसामा बिन लादेन, मसूद अझहर वगैरे निर्घृण लोकांमध्ये फरक काय? मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. पालघरच्या घटनेनंतर एका

विशिष्ट विचारांचे

तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हेसुद्धा खतरनाक आहेत. काहींचा हिंदुत्ववाद या निमित्ताने उफाळून आला आहे, पण या उफाळणार्‍याया उकाळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्‍यायांचा रंग कोणता, हे सांगायला नको. पण आम्हाला या प्रकरणास राजकीय रंग देण्याची इच्छा नाही. साधू मारले गेले हे त्यांचे दुःख नसून साधू मारल्यावर पेटवापेटवीचे प्रयत्न अपयशी ठरले या दुःखाने ते तळमळत आहेत. पालघर जिल्हय़ात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. पोलीस यंत्रणा ‘लॉक डाऊन’च्या बंदोबस्तात अडकली आहे. या बंदोबस्ताचा डोळा चुकवून दुर्दैवी साधू मंडळ गावात शिरले व त्यानंतर जे घडले ते अमानुष आहे. पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना? पण त्यातील गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दिला आहे. आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे. त्यातूनच चंद्रपूर, धुळे आणि डहाणू-पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हिंदू महासभा अध्यक्षाची अलीकडेच गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरही भगवेच कपडे होते. पालघरची घटना सुन्न करणारी आहे. महाराष्ट्र दुःखात आहे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते ‘सामना’ वाचत नसतील पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात!

News Desk

“तुम्हाला अडचण असेल तर….”, मुख्यमंत्र्यांवरच्या गंभीर आरोपावरुन शिवसेनेचा कॉंग्रेसला पलटवार

News Desk

अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही – ऊर्जामंत्री

News Desk