HW News Marathi
महाराष्ट्र

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

बीड – कंत्राटदार धमक्या देऊन कट्यार दाखवून बोगस बिलांवर सह्या घेतात..

“मला रिव्हॉल्व्हर द्या” बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ

बीड जिल्हयात सरकारी अधिकाऱ्यांवर संरक्षण मागण्याची वेळ येणं हे दुर्दैव – पंकजा मुंडे

अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर खपवून घेणार नाही – धनंजय मुंडे

बीड | अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार आहे. “कंत्राटदार धमक्या देऊन , कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात” अशा उद्गाराचे पत्र, अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय..तर आपल्याला कामकाज करता यावे यासाठी चक्क रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे . येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात.असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी. अशी मागणीच कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या या मागणीमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे .

जिल्हयात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय; पंकजा मुंडेंचा सवाल

“कंत्राटदार धमक्या देऊन , कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात” अशा उद्गाराचे पत्र, अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देत, आपल्याला कामकाज करता यावे, यासाठी चक्क रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे. तर यावरून पंकजा मुंडेंनी आक्रमक होत खंत व्यक्त करत सवाल केलाय.

सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हयात काम करणं सध्या कठीण झालयं, खोटया बिलावर सहया करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं. अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणं हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे. बीड जिल्हयात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही त्यांनी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, की अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे. जिल्हयातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही राहिले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्हयात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्स्या हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे. असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत. गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्हयात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही. त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्हयात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही. जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय? असा सवाल पंकजा मुंडे यांनी ट्विट करत व पत्रक काढत केला आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच धनंजय मुंडेंनी याविषयी पत्रक काढून तक्रार देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर आता पंकजा मुंडे या देखील यावर आक्रमक झाल्या आहेत. तर याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते फोनही घेत नाहीत. त्यामुळं पत्र दिल्याने कोकणे यांच्यावर कुणी दबाव टाकलाय का ? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

धमकावणाऱ्यांची पोलिसात तक्रार करा; कारवाई होणार – धनंजय मुंडे

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी, दबाव टाकला जात असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करत रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली होती. तर याची बातमी साम टिव्हीने दाखवली होती. या बातमीची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दखल घेतली असून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर खपवून घेणार नाही. धमकावणाऱ्यांची पोलिसात तक्रार करा, कारवाई होणार. असं धनंजय मुंडेंनी पत्रकातून म्हटलंय.

ते पत्रकात म्हणाले आहेत, की बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्ष-संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात सर्वच विभागातील चांगले काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही सदैव आहोत. अधिकारी वर्गावर दबाव आणायचा किंवा तत्सम कोणताही प्रकार जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकातून दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी एनसीबी ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्तीचंही त्यात नाव

News Desk

नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज, वातावरण तापणार?

News Desk

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार

swarit