मुंबई | भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देणगी अभियान सुरू केले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांसारख्या भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी देणग्या दिल्याच्या पावत्या सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. तसेच जनतेलाही देणगी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधानांनी असे आवाहन करणे योग्य नाही, असे म्हणत जगातील सर्वात श्रीमंत पक्षाला देणगी दिल्याने देश खरंच बलाढ्य होईल का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हंटलं आहे अग्रलेखात ?
भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बड्या मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींत लोकांच्या देणग्यांचेच पाठबळ मिळत राहिले, पण इतर सर्व आणि भाजपमध्ये फरक आहे. भाजपवर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा. भाजप हा सत्तेत नव्हता तेव्हा ‘शेठजीं’चा पक्ष अशीच त्याची ओळख राजकारणात होती. ही ओळख शिवसेनेशी मैत्री झाल्यावर पुसली गेली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर, अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला. भाजप त्याआधी काय होता हे काय कुणाला माहीत नाही? ते काही असले तरी भाजपचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले, याचे कुणाला दुःख होण्याचे कारण नाही. तरीही भारतीय जनता पक्षाने आता लोकांकडून पाच रुपयांपासून, 50, 100, 500 व एक हजार रुपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, पण भाजपने 2019-20 सालात 3,623.28 कोटी रुपयांची ‘संपत्ती’ जाहीर केली आहे. भाजपचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे. तसे इतर पक्षांचेही आहे. 2014 पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली हे काही लपून राहिलेले नाही. कधी काळी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हीच बरकत होती. भारतीय जनता पक्षाला पैसा जमा करण्याची कला अवगत आहे. तशी राजकीय
विरोधकांच्या आर्थिक नाड्या
आवळण्याच्या कलांतही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. नोटाबंदी काळात त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेच होते, स्वपक्षाच्या बड्या देणगीदारांना आधीच नोटाबंदीची माहिती देऊन त्यांना सुरक्षित केले, पण विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच त्यांचा उदात्त हेतू होता. विरोधी पक्षांच्या हाती निवडणुका लढण्यासाठी फार साधने राहू नयेत व त्यांच्यावर भिकेची वेळ यावी अशी तरतूद गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलगू देसम, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या देणगीदारांना या ना त्या मार्गाने त्रास द्यायचा व फक्त भाजपला पैसे द्या, इतरांना द्याल तर याद राखा अशा गुप्त मोहिमा राबविण्यात आल्याचे खुलेपणाने बोलले जात आहे. त्यामुळे ‘भाजप’ हा अल्पावधीत अतिश्रीमंत पक्ष झाला व त्यांचा थाट-माट-तोरा वाढला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आजही उत्तर प्रदेशात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतशा आयकर विभागाच्या धाडींचा जोर वाढू लागला. या धाडींमागे एक राजकीय सुसूत्रता आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी हजारो कोटी रुपये आधीच जमा झाले असतानाही रामाच्या नावावर जनतेकडून पावत्या फाडण्याच्या प्रकारांवरही टीकेची झोड उठली. भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय? याचेही उत्तर पंतप्रधान मोदी यांनी देऊन टाकले आहे. “देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजप व आपला देश आणखी बलाढ्य होईल.” अशी चिंता पंतप्रधान मोदी यांनी करावी
हे आश्चर्यच
आहे. देशात लॉक डाऊन पुन्हा येत आहे. देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे, स्वातंत्र्यवीर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्र्ाज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढ्य होत जाईल, पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल. मागच्या लॉक डाऊन काळात आर्थिक व्यवस्था ढासळून पडली आहे. महागाई, बेरोजगारीने कहर केला आहे. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. त्यात कोणताही दिलासा मिळत नाही. मग अशा वातावरणात जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र आहे? भाजपच्या देणगी मोहिमेचा व राष्ट्रहिताचा, देश बलाढ्य होण्याचा काडीमात्र संबंध नाही. भाजपच्या तिजोरीत बडे उद्योगपती, ठेकेदार, बिल्डर्स, श्रीमंत लोक मोठय़ा प्रमाणात देणग्या देत असतात. सत्ताधारी हे मोठे लाभार्थी ठरतात व इतर पक्षांनाही कमी-जास्त प्रमाणात देणग्यांचा लाभ मिळत असतो. हे खरे असले तरी भाजप सोडून इतरांना देणग्या मिळू नयेत, निवडणुकीत इतर राजकीय पक्षांची आर्थिक नाकेबंदी व्हावी यासाठीही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. इतर राजकीय पक्षांवर आर्थिक निगराणी ठेवली जाते व त्यांचे नाक-तोंड दाबून भाजप स्वतःची श्रीमंती दिवसेंदिवस वाढवीत आहे. कोविड काळात स्थापन झालेल्या खासगी स्वरूपाच्या पी. एम. केअर फंडात हजारो कोटी रुपये गोळा झाले. त्यातील आर्थिक उलाढालींवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजप किंवा पंतप्रधान अद्याप देऊ शकले नाहीत. भाजपच्या तिजोरीची व पी. एम. केअर फंडाची तिजोरी वाढता वाढता वाढतच आहे. त्यात नागरिकांकडून 5 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत देणग्या घेऊन नैतिक मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे देश आणखी बलाढ्य खरंच होईल? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.