मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द काढल्याने त्यांच्या विरोधात तक्रार शिवसैनिकांनी नोंदवली होती. अटकेनंतर मात्र काही तासातच त्यांना जमीन देखील मिळाला. दुसरीकडे शिवसेनेकडून नारायण राणेंना जशास तसं उत्तर दिलं जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनामधून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
त्यामुळे मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले
“केंद्रातले एक मंत्री श्री. नारायण राणे महाराष्ट्रात भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येडय़ांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त श्री. राणे यांनी परंपरेने गोंधळ घातला. त्यामुळे मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करणाऱ्यांची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी
“नारायण राणे यांना केलेली अटक ही घटनाविरोधी आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांपासून महाराष्ट्राचे श्री. फडणवीस यांच्यापर्यंत सगळेच सांगत आहेत. आपल्या पक्षाच्या माणसाचा बचाव करणे इथपर्यंत ठीक, पण त्या कायदेशीर कारवाईस घटनाबाह्य ठरवणे हेच असंवैधानिक आहे. श्री. राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असंसदीय व अनकॉन्स्टिटय़ुशनल भाषेत एकेरी पद्धतीने केलेला उल्लेख जे. पी. नड्डा व फडणवीस यांना मान्य आहे काय? नड्डा हे हिमाचल प्रदेशातून येतात. ते त्यांच्या राज्यात जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांना ‘‘कानाखाली मारीन’’ अशी धमकीची भाषा करू शकतात का? याचे उत्तर ‘‘होय’’ असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करणाऱ्यांची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर मुंबईत उतरतात, पूरग्रस्तांना भेटण्यासाठी कोकणात जातात, तेथे शासकीय अधिकाऱ्यांसमोर बेभानपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उद्धार करतात, ‘तुमचा मुख्यमंत्री गेला उडत!’ असे बोलतात. हे त्यांचे बेताल बोलणे कॉन्स्टिटय़ुशनल आहे काय? हे श्री. नड्डा व फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समजावून सांगायला हवे. राणे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या मर्यादा पाळायला तयार नाहीत व त्यांच्यातल्या बेभानपणास भाजप खतपाणी घालत राहिला,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही
“महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाची हळद लावलेला एक नवाकोरा आमदार देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत जाहीर विधान करतो व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावर फक्त सारवासारवी करून अप्रत्यक्ष अशा बेतालपणास फूस देतात. हे कसले संस्कार? उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे!,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं आहे
“राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्याचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं आहे”, असं राऊत म्हणाले आहे.
एक दिवस हीच वेळ राणेपुत्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरे नाही, असे श्री. फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख श्री. राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे.
”तुम्ही बिनबापाचे आहात काय?”
राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. ”तुम्ही बिनबापाचे आहात काय?” असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल.
अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?
उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.