HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही”

मुंबई | उद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.

“महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,” असं संजय राऊत बोलले आहेत.

“यामध्ये अनिल परब यांचं नाव आलं आहे. अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं संजय राऊत बोलले आहेत.

“अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सचिन वाझेंच्या पत्रात काय?
सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली.

असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला. या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या(सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.

अनिल परब यांनी आरोप फेटाळले
“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी म्हटलंय. त्याचबरोबर ‘माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत, त्याचा माझा संबंध नाही. अशी चौकशी सुरु आहे हे मला माहिती नाही. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असंही परब म्हणाले आहेत.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून 50 कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.

काय म्हणाले अनिल परब ?

* सचिन वाझेंनी पत्रात केलेले आरोप धादांत खोटे आहेत.

* मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. माझ्यावर असे कोणतेही खंडणीचे संस्कार नाहीत.

* मी बाळासाहेबांची आणि माझ्या २ मुली आहेत त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगतो कि, हे सगळे आरोप खोटे आहेत. हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

* गेले २-३ दिवस भाजपचे पदाधिकारी जो आरडाओरडा करत होते कि ह्यात आम्ही अजून तिसरा बळी घेऊ ह्याचा अर्थ त्यांनी हे प्रकरण शिजवले आहे.

* सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपने हे प्रकरण तयार केले आहे.

 

Related posts

MPSCExam : विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

News Desk

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk

कोणी ध चा म करायला नको म्हणून आधीच सांगतो पवार साहेबांना भेटणार आहे, अपक्ष आमदाराचे स्पष्टीकरण

News Desk