HW News Marathi
महाराष्ट्र

पवार – फडणवीसांच्या भेटीत रहस्य वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाही! – सामना

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील , पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. कोणीही सदा सर्वकाळ सत्तेवर राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. राम-कृष्णही आले-गेले तेथे आजचे राजकारणी कोण? देश आणि राज्यावरचे संकट मोठे आहे. उत्तर प्रदेश, बिहारात गंगेत प्रेते तरंगत आहेत… वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आहे.

फडणवीस – पवार भेटीत हा विषयही चर्चेला आला असेलच. पवार-फडणवीस भेटीत रहस्य किंवा गूढ असे काहीच नाही. कोणाला त्यात रहस्यमय वगैरे वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाहीत असेच म्हणावे लागेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीस-पवार भेटीवर त्यांनी आजच्या (२ जून) रोखठोक अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील, पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर श्री. पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. कोणीही सदा सर्वकाळ सत्तेवर राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. राम–कृष्णही आले–गेले तेथे आजचे राजकारणी कोण?

देश आणि राज्यावरचे संकट मोठे आहे. उत्तर प्रदेश, बिहारात गंगेत प्रेते तरंगत आहेत… वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आहे. फडणवीस–पवार भेटीत हा विषयही चर्चेला आला असेलच. पवार–फडणवीस भेटीत रहस्य किंवा गूढ असे काहीच नाही. कोणाला त्यात रहस्यमय वगैरे वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाहीत असेच म्हणावे लागेल!

शरद पवार यांना सध्या विश्रांतीची गरज आहे, पण एक तर स्वतः पवारांना विश्रांती या शब्दाशी वैर आहे, दुसरे म्हणजे त्यांचे चाहते आणि विरोधकही पवारांना विश्रांती घेऊ देत नाहीत. पवारांचे चाहते देवेंद्र फडणवीस हे पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. ‘‘आता ही भेट नक्की कशासाठी झाली? काहीतरी राजकारण शिजत आहे. फडणवीस हे उगाच जाऊन असे भेटणार नाहीत. वरचा काहीतरी निरोप वगैरे घेऊनच फडणवीस गेले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ आता नक्की,’’ असे फुगे सोडण्याचे काम परंपरेप्रमाणे सुरू झाले.

श्री. फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सदिच्छा भेटच होती व ते खरेच आहे. पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान मोदींपासून इतर अनेक पक्षांतील लोक त्यांच्याशी सल्लामसलत करीत असतात. आपल्या लोकशाहीचे हे सगळय़ात मोठे वैशिष्टय़ आहे. आमची लोकशाही ही बंदिस्त किंवा डोळय़ांना झापडं लावलेली नाही. येथे संवादाला महत्त्व आहे. पुन्हा जेव्हा जेव्हा आपल्या देशात हुकूमशाही की लोकशाही असा सवाल निर्माण होतो त्या त्यावेळी लोकशाहीचाच जय होतो. त्या लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे.

इंदिरा गांधी यांचा पराभव जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने केला. त्याआधी इंदिराजींनी जयप्रकाश यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले, तरीही पराभूत झालेल्या इंदिरा गांधी जयप्रकाश नारायण यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेत असत. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच पक्षांचे लोक ‘मातोश्री’वर जात असत. काही नेत्यांकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहायला हवे व आज श्री. शरद पवार त्यापैकीच एक प्रमुख नेते आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे पवारांना भेटले. यात वाकडा अर्थ काढण्याची गरज नाही.

भेटले असतील तर बरेच झाले. बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले. त्या भेटीतून त्यांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल. मुंबईत ‘मेट्रो’ची चाचणी सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वगैरे सगळे प्रमुख नेते त्या सोहळय़ास उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा दाखवित होते त्याचवेळी बाहेर विरोधी पक्ष भाजप काळे झेंडे फडकवून निषेधाच्या घोषणा देत होता. हा सर्व गोंधळ सुरू असताना विरोधी पक्षनेते फडणवीस शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे म्हणे बातम्यांची खळबळ माजली.

फडणवीस आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली असेल याच्या ‘पुडय़ा’ आणखी दोनेक दिवस सुटतील. पण जे पवारांना ओळखतात ते नक्कीच सांगू शकतील की, पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल. विरोधी पक्षाने संकटकाळात कसे जबाबदारीने वागायला हवे याचे चोख मार्गदर्शन श्री. पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेत्यांना केले असावे. सध्या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष बेभान झाला आहे व विरोधासाठी विरोध हेच त्यांचे ध्येय ठरले आहे.

सध्याची स्थिती एकमेकांना सहकार्य करून राज्याला गती देण्याची आहे, पण विरोधी पक्षाने सरकारशी असहकार पुकारला आहे. राज्यातल्याच नव्हे, तर देशातल्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टींचे खापर ते सरकारवर फोडत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षाची व विरोधी पक्षनेत्यांची उत्तम परंपरा आहे. त्यातील एक विरोधी पक्षनेते श्री. शरद पवारसुद्धा होते. राज्य सरकारची कोंडी करून राज्याच्या हिताची कामे मार्गी लावणे हे विरोधी पक्षाचे मुख्य काम आहे. सरकार कोठे चुकत असेल तर आवाज चढवून बोलण्याचा अधिकारही विरोधी पक्षनेत्यांना आहेच.

श्री. फडणवीस यांनी उत्तम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा पुढे चालवली तर राजकारणातील त्यांचा नावलौकिक वाढेल. फडणवीस यांचे सरकारशी किंवा सत्ताधारी पक्षाशी भांडण असू शकते, पण महाराष्ट्राशी भांडण असू नये. सध्या विरोधी पक्षाचे भांडण महाराष्ट्राशी सुरू आहे ते राज्याच्या हिताचे नाही. एक बहुमताचे स्थिर सरकार असताना व सरकार कोरोना, वादळ, महामारी, आर्थिक मंदी यांसारख्या संकटांशी सामना करीत असताना रोज सरकार पाडण्याचे स्वप्न बघणे कितपत योग्य आहे?

महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पाडायचे या एकमेव ध्येयापोटी विरोधी पक्ष काम करीत आहे व फडणवीसांचे इतर सहकारी अशी वक्तव्यं रोज करीत आहेत. शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील, पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर श्री. पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. कोणीही सदा सर्वकाळ सत्तेवर राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. राम-कृष्णही आले-गेले तेथे आजचे राजकारणी कोण?

देश आणि राज्यावरचे संकट मोठे आहे. उत्तर प्रदेश, बिहारात गंगेत प्रेते तरंगत आहेत… वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आहे. फडणवीस-पवार भेटीत हा विषयही चर्चेला आला असेलच. पवार-फडणवीस भेटीत रहस्य किंवा गूढ असे काहीच नाही. कोणाला त्यात रहस्यमय वगैरे वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाहीत असेच म्हणावे लागेल!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे पदाधिकारी दत्तात्रय पाटोळे यांची सांगलीत निर्घृण हत्या !

News Desk

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

News Desk

बीडचा पीक विमा पॅटर्न राज्यात राबवा, ठाकरे सरकारने पंतप्रधानांच्या बैठकीत मागणी

News Desk